कसबा बीड /प्रतिनिधी
कोगे तालुका करवीर येथे मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व दुकाने बंद करून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी एक मराठा….लाख मराठा…! आरक्षण आमच्या हक्काचे….नाही कोणाच्या बापाचे…अशा घोषणा देत सखल मराठ्यांनी गावातून रॅली काढली. मराठा समाजाला आरक्षणाशिवाय आर्थिक घटकाची प्रगतीसाधता येणार नाही. असे कुंभी- कासारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक भगवान रामा पाटील यांनी आपले मनोगतात सांगितले.
आरक्षणाशिवाय मराठा समाजातील उच्चशिक्षित व शिक्षित तरुणांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी मराठी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे चाळकोबा वि.का. स . सेवा संस्थेचे चेअरमन कृष्णात सदाशिव पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मराठ्यांची संख्या जास्त आहे ,त्यामुळे आजच्या क्षणाला मराठा समाजातील मुलांची लग्न होत नाहीत . नोकरी नाही , उच्चशिक्षित तरुण वर्ग बेकार आहेत , त्यामुळे वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी व मराठी समाजाला न्याय देण्यासाठी शासनाने लक्ष घालावे असे यशवंत बँकेचे संचालक उत्तम दादू पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजामधून निवडून गेलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी आरक्षणासाठी योगदान द्यावे. नाहीतर उपेक्षित मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संघटक सचिन पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. दिवसभर गावातील असणारी सर्व दुकाने बंद करून राज्य शासनाबाबत असलेला तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी कोगे गावच्या सरपंच बनाबाई यादव, उपसरपंच नामदेव सुतार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कुंभी कासारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक भगवान रामा पाटील, कुंभीचे व्हा.चेअरमन विश्वास पाटील, कुंभी बँकेचे संचालक रणजीत पाटील,यशवंत बँकेचे संचालक उत्तम पाटील,चाळकोबा विकास सेवा संस्थेचे चेअरमन कृष्णात पाटील,शिवाजी पाटील, संतोष मोरे आदी तसेच गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी तरुण वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.