कौलव/वार्ताहर
गुप्त धनाच्या लालसे पोटी कौलव ता. राधानगरी येथे नरबळी देण्याचा प्रयत्न सरपंच रामचंद्र कुंभार आणि ‘अनिस’ च्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पडला. या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसानी संशयीत म्हणून कौलव येथील शरद माने, कराडचा मांत्रिक चंद्रकांत धुमाळ यांच्यासह आणखीन चार जणांना अटक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांनी शरद माने आणि त्याच्या सहकार्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रात्री उशिरापर्यंत घटनेची कसून चौकशी सुरू होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौलव येथे शरद माने यांच्या घरी काही मांत्रिक गेले काही दिवसापासून येत असल्याची माहिती सरपंच रामचंद्र कुंभार सदस्याना मिळाली. गुप्तधनाच्या उद्देशाने घरात खड्डा मारला जात असल्याचे त्यांना बातमी लागली. काहीतरी चुकीचे घडण्याऐवजी सतर्क राहून त्यांनी माने याच्या घरी गेले असता एका चटईवर हळद, कुंकू, सुपारी, नारळ, पानाचे विडे, लिंबू त्यांच्यावरती टाचण्या मारलेल्या आणि पूजा करत असल्याचे चित्र दिसले. त्यावेळी चंद्रकांत महादेव धुमाळ हे मंत्रोच्चार करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्याच्या गळ्यात रुद्रक्षाच्या माळा घातलेल्या होत्या. त्याच्या शेजारी आरोपी शरद माने बसला होता. ते अनिष्ट आणि अघोरी प्रथा जादू टोणा असल्याचे लक्षात आले. अजित पाटील, सरपंच कुंभार देवघरात गेले असता देव घरातील खोलीत अंदाजे चार फुटाचा खडा खणलेला त्यांना दिसून आला. बाजुला मातीचा ढीग पडलेला होता. अजित पाटील यांनी विचारले की ही कसली पूजा आहे. संशयीत आरोपी संतोष लोहार म्हणाला सदर खड्यात गुप्तधन मिळणार आहे त्यासाठी पूजा सुरू आहे. आरोपी आशिष चव्हाण यांनी येथून निघून जा अन्यथा ठार मारण्याची धमकी दिली.