सामाजिक वनीकरण व लोकसहभागातून वृक्ष लावगड केलेल्या लाखो रुपयांचा चुराडा
विश्वनाथ मोरे , कसबा बीड / प्रतिनिधी
कसबा बीड तालुका करवीर येथील सातेरी महादेव डोंगर करवीर पश्चिम भागातील जागृत व प्राचीन मंदिर आहे.या पश्चिम भागातील धार्मिक व पर्यटन क्षेत्र असलेल्या सातेरी महादेव डोंगर परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने हरित टेकडी योजनेतून लावण्यात आलेली हजारों झाडे अज्ञातांनी लावलेल्या आगीत भस्मसात झाली आहेत. वृक्षारोपणासाठी करण्यात आलेला लाखों रुपयांच्या खर्चाचा चुराडा झाला आहे. डोंगरावरील हे विदारक चित्र पाहून पर्यावरण प्रेमींकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात असून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
येथील डोंगरावरील प्राचीन महादेव मंदिर व सातेरी मंदिरामुळे या क्षेत्राला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. वर्षातील दर सोमवारी, श्रावण सोमवारी व महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक येत असतात. तसेच येथील नैसर्गिक रचनेमुळे वर्षभर येणाऱ्या पर्यटकांची संख्याही प्रचंड आहे. त्यामुळे डोंगरावर वृक्षसंपदा असावी, येथील परिसर हिरवाईने नटावा, येथील नैसर्गिक सौन्दर्यात आणखी भर पडावी म्हणून हरित टेकडी योजनेतून वृक्षारोपण चळवळ उभी राहिली. मात्र या वणव्यामुळे हिरवाईवरच घाला घातला आहे.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सन २०१६ – १७ सालात जेसीबी, पोकलँडच्या सहायाने खड्डे मारून विविध जातींच्या सुमारे १० हजार रोपांची शास्रोक्त पद्धतीने लागवड करण्यात आली होती. धोंडेवाडी ते सातेरी रस्त्याच्या दुतर्फाही अंदाजे हजार झाडे लावली गेली होती. वृक्षारोपण चळवळीत भागातील शाळा महाविद्यालयातील मुलांमुलींचा, विविध सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमिंचा विशेष सहभाग होता. सलग तीन वर्षे वनीकरण विभागाकडून झाडांची देखभाल, दुरुस्ती करण्यात येत होती. राजेंद्र सूर्यवंशी युवा मंचच्या वतीने उन्हाळ्यात झाडांना टँकरने पाणी देण्याचे काम केले होते.
डोंगरावरील पाण्याची दुर्भीक्षता पाहता सर्वांच्या प्रयत्नातून जवळपास निम्मी अधिक झाडे चांगल्या पद्धतीने जगविण्यात यश आले होते.ही झाडे जगविण्यासाठी हजारों हात झटले होते.
मात्र मागील पाच सहा दिवसांपूर्वी डोंगरावर लावलेल्या आगीमुळे ही वृक्षसंपदा मातीमोल झाली आहे. महाशिवरात्रीनिमित्त गेलेल्या हजारों भाविकांनाही डोंगरावरील जळालेली झाडे, भकास झालेला डोंगर पाहून अतिव दुःख झाले. ही भयाण अवस्था, वृक्षसंपदेचे व पर्यावरणाचे झालेले नुकसान पाहून पर्यावरण प्रेमींकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची तीव्र मागणी होत आहे.
सामाजिक वनीकरण व लोक सहभागातून धोंडेवाडी पासून दुतर्फा वृक्ष लागवड केली होती. उन्हाळ्यात पाण्याची बाटली घेऊन पर्यटक व नागरिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून जतन केली, पण रात्रीच्या वेळी कोणीतरी आग लावून वणन पेटवला. यामुळे सर्व झाडे या आगीत भस्मसात झाली . ही बातमी समजल्यावर खूप उशीर झाला, लवकर समजले असते तर आग विझवण्यासाठी प्रयत्न करता आला असता. पण अशा समाजकंटक प्रवृती विरोधी कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती करवीर पंचायत समिती.
सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली होती.त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले,पण वनीकरणाच्या संरक्षणासाठी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.
दादासो लाड, सरपंच, ग्रामपंचायत गणेशवाडी









