कोल्हापूरकरांची सोशल मिडीयावर गवई यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त
कोल्हापूर: या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे आहेत, तर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन करण्यासाठी सहा जिह्यातील वकील गेल्या 43 वर्षांपासून लढा देत होते. 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर सर्किट बेंचची घोषणा करण्यात आली. यामुळे सहा जिह्यातील वकिलांच्या लढ्यास यश मिळाले. सर्किट बेंचचे काम पूर्ण झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सीपीआरसमोरील सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन होईल. त्यानंतर मेरी वेदर ग्राउंडवर उद्घाटन समारंभ होणार आहे.
यावेळी सहा जिह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, आजी-माजी न्यायाधीश, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वकील, पक्षकार आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत. शासकीय इमारतींवर विद्युत रोषणाई केली असून, अभिनंदन आणि आभाराचे फलक शहरात झळकले आहेत.
शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त
सर्किट बेंच उद्घाटन सोहळ्यासाठी एक हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री यांचे आगमन होणार आहे. शनिवारी श्वानपथकाच्या मदतीने सर्व परिसराची तपासणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाची रंगीत तालीम पार पडली.








