सेक्युरीटी डिपॉझिटच्या मुद्यावरून वर्कऑर्डरला ब्रेक; रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघातांची मालिका; केंद्रशासनाने तत्काळ तोडगा काढण्याची गरज; रस्त्याकडेच्या 1700 झाडांपैकी 750 झाडे बचावणार
कृष्णात चौगले / कोल्हापूर
कोल्हापूर-कळे राष्ट्रीय महामार्गाच्या दुपरीकरणाच्या कामाला वर्षभरापूर्वी मंजूरी मिळाली असून त्याची निविदा देखील भरली आहे. जालना येथील व्ही.पी.सेट्टी कंपनीने तब्बल 36 टक्के कमी दराने निविदा भरली आहे. त्यामुळे नवीन शासन निर्णयानुसार ज्या कंपनीने 20 टक्केहून अधिक कमी दराने निविदा भरली असेल त्या कंपनीने साडेबारा टक्के सेक्युरिटी डिपॉझिट शासनाकडे जमा करणे अपेक्षित आहे. पण निविदा भरलेल्या काळात कोरोना महामारी असल्यामुळे सुरुवातीस भरलेल्या परफॉर्मन्स डिपॉझिटवर वर्कऑर्डर द्यावी, सिक्युरिटी डिपॉझिट लादू नये असे कंपनीचे म्हणणे आहे. परिणामी शासन आणि कंपनीच्या वादात कामाची वर्कऑर्डर झाली नसून कोल्हापूर कळे मार्गाचे काम रखडले आहे.
कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे या राष्ट्रीय महामार्गाचे (क्र.166 जी) दुपरीकरण प्रस्तावित आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर (फुलेवाडी)-कळे या 16.44 किलोमीटर रस्त्याचे दुपरीकरण होणार आहे. 123 कोटींच्या या प्रोजेक्टला केंद्रशासनाने मंजुरी दिली आहे. पण हे काम करण्यासाठी करार झालेल्या व्ही.पी.सेट्टी या कंपनीने 36 टक्के कमी दराने मार्च 2022 मध्ये निविदा भरली असून 89.91 कोटींमध्ये हे काम केले जाणार आहे. ठेकेदाराने अडीच टक्के परफॉर्मन्स डिपॉझिट भरली आहे. पण 20 टक्केहून अधिक कमी दराने निविदा भरल्यामुळे शासनाने पुन्हा साडेबारा टक्के सिक्युरिटी डिपॉझिट भरण्यास सांगितले आहे. पण कोरोना काळात मंजूर झालेल्या कामासाठी सिक्युरिटी डिपॉझिट घेऊ नये, त्यामध्ये सूट द्यावी अशी मागणी कंपनीने शासनाने केली आहे. शासनाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे कामाची वर्कऑर्डर होऊ शकलेली नाही. याबाबत 29 ऑगस्ट रोजी कंपनीचे प्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱयांची बैठक झाली असून लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेबरअखेरीस वर्कऑर्डर निघण्याची शक्यता असून ऑक्टोबरच्या सुरुवातीस रस्त्याचे काम सुरु होणार आहे. वर्कऑर्डरनंतर काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदारास 18 महिन्यांची मुदत आहे. एकूण 16 मीटर रुंदीचा हा रस्ता होणार आहे. यामध्ये 10 मीटर काँक्रीटचा रस्ता तर दोन्ही बाजूस 3 मीटरची साईड पट्टी होणार आहे. त्यामध्ये रस्त्याशेजारील गावांनजीक सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सुमारे 1 किलोमीटर ते 500 मिटर लांबीचे आणि 1 मीटर रुंदीचे काँक्रीट गटर बांधले जाणार आहे. भोगावती नदीवर बालींगा येथील जुन्या पुलाच्या शेजारीच नवीन मोठा पूल बांधला जाणार आहे. तर दोन ठिकाणी लहान पूल, 12 मोहऱया, 5 साकव, 4 पॅसेंजर शेल्टर (प्रवासी निवारा शेड, स्टँड) होणार आहे
कळे-गगनबावडा रस्त्याच्या कामास तांत्रिक मान्यता
कोल्हापूर-गगनबावडा हा तळकोकणाला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याचे दुपदरीकरण होणे अत्यावश्यक होते. केंद्रीय वाहतूक आणि भुपुष्ठ मंत्री नितिन गडकरी यांनी या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करून पहिल्या टप्प्यात कोल्हापूर ते कळेपर्यंत रस्त्याच्या दुपदरीकरणासाठी निधी मंजूर केला आहे. पुढील टप्प्यात कळे ते गगनबावडा रस्त्याचे काम केले जाणार असून त्यास तांत्रिक मान्यता मिळाली आहे. शासनाकडून लवकरच अर्थिक तरतूद केली जाणार आहे.
रस्त्याकडेची 750 झाडे बचावणार
कोल्हापूर-कळे मार्गावर एकूण 1700 झाडे आहेत. यामधील रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडून 16 मीटरच्या आत असलेली 950 झाडे तोडली जाणार असून त्यांचे मुल्यांकन सुरु आहे. तर 16 मीटरच्या बाहेर असणारी 750 झाडे तोडली जाणार नाहीत. यामध्ये तोडल्या जाणाऱया 950 झाडांच्या पाच पटीने वृक्षलागवड केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीने वृक्षारोपणासाठी जागेची उपलब्धता करून देण्याची महसूल विभागाकडे मागणी केली आहे.
रस्त्यावरील खड्डयांमुळे अपघातांची मालिका
तळकोकणाला जोडणारा रस्ता म्हणून कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ओळखला जातो. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरु आहे. परिणामी अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून रस्ते अपघातामध्ये गेल्या चार महिन्यांत सुमारे दहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरु होईपर्यंत या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
ऑक्टोबरच्या सुरुवातीस रस्ते काम सुरु होईल
सेक्युरिटी डिपॉझिटचा मुद्दा येत्या पंधरा दिवसांत निकालात निघेल. त्यामुळे सप्टेबर अखेरीस वर्कऑर्डर होऊन ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस रस्त्याचे काम सुरु होईल.
अविनाश मरजीवे, प्रोजेक्ट मॅनेजर









