१३.०२ टीएमसी पाणीसाठा : पावसाचा जोर कायम
प्रतिनिधी/सरवडे
राधानगरी तालुक्यात आठवडाभर पावसाचा जोर कायम असून काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात एका दिवसात ५६ व आज अखेर १०९५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. धरणात ५१टक्के म्हणजेच १३.०२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
राधानगरी तालुक्यात आठवडाभर पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी धरणांच्या व भोगावती, दूधगंगा, तुळशी, धामणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे काळम्मावाडी धरणाची पाणी पातळी ६३४.११ मी झाली असून व पाणी साठा ३४८.५८५ द. ल. घ. मी. इतका झाला आहे. धरणाची पाणी साठा क्षमता २५.४. टीएमसी इतकी असून आज अखेर १३.०२ इतका पाणी साठा झाला आहे.
हे ही वाचा : Ratnagiri : कोकणात पाऊस आकडेवारीतही मुसळधार
सध्या धरणातून नदी पात्रात केला जाणारा विसर्ग कमी असला तरी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दूधगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर अनेक बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संततधार पावसामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.