पाच वर्षात अडीच लाखांहून अधिक मूर्ती विसर्जित : पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, कोटीतीर्थचा भार झाला कमी : गणेशोत्सवानंतर खण दुर्लक्षित : भविष्यातही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी खणीचे संवर्धनाची गरज : गाळ तात्काळ काढणे आवश्यक
विनोद सावंत कोल्हापूर
इराणी खणीत पाच वर्षात अडीच लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. महापालिकेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यासाठी इराणी खण मदतीला आली आहे. आतापर्यंत हजारो दुर्गामूर्तींचेही येथे विसर्जन झाले आहे. शहरातील पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, कोटीतीर्थसह पाण्याचे नैसर्गिक स्त्राsतवर पडणारा अतिरिक्त भार या निमित्ताने कमी झाला आहे. भविष्यातही पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यासाठी महापालिकने इराणी खणीचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
कोल्हापूरात 1988 पासून पंचगंगा नदी आणि रंकाळा तलावात मूर्ती विसर्जन करू नये, यासाठी चळवळ सुरू केली. प्रारंभी यास प्रचंड विरोध झाला. कालांतरने कोल्हापूरकरांनीच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ हातात घेतली. यास गेल्या पाच वर्षात अभूतपूर्वक यश मिळाले. 2019 मध्ये महापूर आल्याने पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जनावर मर्यादा आल्या. यानंतर सलग दोन वर्ष कोरोनामुळे महापालिकेने गणेशोत्सवावेळी प्रभागामध्येच विसर्जन कुंड ठेवले. कुंडात विसर्जित झालेल्या मूर्ती इराणी खण येथे विसर्जित केल्या. पाच वर्षात 2 लाख 50 हजार घरगुतीसह सार्वजनिक गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित झाल्या आहेत. पंचगंगा नदी, रंकाळा तलावासह कोटीतीर्थचा भार इराणी खणीने स्वत:वर घेतला. यामध्ये दोन वर्षात 36 हजार मूर्ती स्वयंमचलित यंत्रणेतून मूर्ती विसर्जित झाल्या आहेत. तर थेट इराणी खणीत 33 हजार मूर्ती विसर्जित झाल्या आहेत. एकूणच पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये इराणी खणीचा वाटा सिंहाचा राहिला आहे.
इराणी खणीच्या संवर्धनाची गरज
गणेशमूर्ती विसर्जनावेळी इराणी खणीला महत्व येते. गणेशोत्सव झाल्यानंतर हा परिसर दुर्लक्षित होतो. मागील वर्षी खण परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने खणीतील गाळ काढण्यात आला. येथून पुढेही जर गणेशोत्सव पर्यावरणक करायचा असेल तर खणीचे संवर्धन होणे आवश्यक आहे. खणीच्या चारीही बाजून सरंक्षक भिंत नाही. कायमस्वरूपी विजेची सोय नाही. कच्चे रस्ते आहेत. ही सर्व कामे वर्षात होणे आवश्यक आहे.
गाळ काढण्याचा प्रस्ताव धुळखात
इराणी खण नंबर एकमधील गाळ गतवर्षी गणेशोत्सवापूर्वी काढला. यामुळेच दोन वर्ष येथे मूर्ती विसर्जित करणे शक्य झाले. इराणी खण लगत असणाऱ्या इराणी खन नंबर दोन मधील गाळ काढण्याचा प्रस्ताव वर्ष होत आला तरी धुळखात पडून यावर्षी येथील गाळ काढला नाही तर पुढील वर्ष येथे मूर्ती विसर्जनास अडथळा येऊ शकतो.
शेजारील गावांचाही भार इराणी खणीवर
इराणी खणीत केवळ कोल्हापूर शहरातीलच नव्हे तर शहरलगतच्या गावातील मूर्तीही विसर्जित होत आहेत. कळंबा, वाशीसह सांगरूळ गावांचा यामध्ये समावेश आहे. दरवर्षी हजारो मूर्ती इराणी खणीत विसर्जनासाठी येतात.
‘नगरोत्थान’मधून इराणी खण विकसित करणार
इराणी खण नंबर 2 चा यावर्षी गाळ काढला जाणार आहे. कायमस्वरूपी इराणी खणीत गणेशमूर्ती विसर्जन करता यावे यासाठी खण परिसर विकसित करणार आहे. यामध्ये चारीही बाजूने संरक्षक भिंत बांधणे, खणीत मूर्ती विसर्जन सुलभ होण्याच्या दृष्टीने रॅम्प करण्याचे नियोजन आहे. नगरोत्थान योजनेतून यासाठी निधीची मागणी करणार आहे.
रविकांत आडसुळ, अतिरिक्त आयुक्त-महापालिका
वर्ष इराणी खणीत मूर्ती विसर्जन
2023 55 हजार 460
2022 55 हजार
2021 53 हजार
2020 50 हजार
2019 40 हजार