उचगाव / वार्ताहर
कोल्हापूर हुपरी मार्गावरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसच्या अपुऱ्या फेऱ्या,तसेच बस वेळेत न येणे आणि वेळेवर न थांबणे या महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे उचगाव, मणेरमळा, गडमुडशिंगी फाटा, व्यंकटेश पार्क,वेद मिल, चव्हाणवाडी – न्यू वाडदे , हॉटेल सत्यजीत, अमित मिल आणि सांगवडे परिसरातील शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक नुकसान रोजच सहन करावे लागत असून, यासाठी या मार्गावरील बसेसच्या फेऱ्या शाळेच्या वेळेत तात्काळ वाढवा व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी या मागणीचे निवेदन यांच्यावतीने शिवसेनेचे ( ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट आणि अवधूत साळोखे यांच्या नेतृत्वाखाली अतुल माने, विभागीय अधिक्षक , नियंत्रण अधिकारी यांना देण्यात आले.विद्यार्थांच्या भवितव्यासाठी रास्ता रोको केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.
उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट म्हणाले, इकडे शासन आपल्या दारी आणि दुसरीकडे परिवहन महामंडळाची लालपरी विद्यार्थ्यांना वेळेवर नाही.त्यामुळे विद्यार्थांना होत असणाऱ्या रोजच्या त्रासावर कायमचा बंदोबस्त करावा,बसेस च्या फेऱ्यांमध्ये त्वरित वाढ करून विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश द्यावा , ह्यामध्ये जर त्वरित सुधारणा झाली नाही तर कोणत्याही परिस्थितीत येत्या २० तारखेनंतर रास्ता रोको आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
या आंदोलनात ग्रामीण जिल्हा समन्वयक दत्ता पाटील, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विनोद खोत, दिव्यांग सेना, संदीप दळवी, राहुल गिरूले, शांताराम पाटील यांच्याबरोबर शिवसैनिक, विद्यार्थी- पालक व परिसरातील ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.









