सांगरुळ / वार्ताहर
सांगरूळ (ता. करवीर ) येथील प्रयोगशिल शेतकरी संभाजी शिवाजी चव्हाण व चंद्रकांत शिवाजी चव्हाण यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्याने घरातील प्रापंचिक साहित्य, धान्य व जनावरांचा चारा तसेच शेती कामाचे लाकडी अवजारे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे चार लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. लगतच्या सतर्क नागरिकांनी प्रसंगावधान राखून जनावरे घराबाहेर काढल्याने जनावरांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचला नाही .
सांगरुळ ( ता.करवीर ) येथील चंद्रकांत शिवाजी चव्हाण यांचे गावाच्या पूर्वेकडील भागास कासोटे पाणंद येथे घर आहे . सांगरूळ येथे सोमवारी मध्यरात्रीपासून तांत्रिक बिघाडामुळे लाईट बंद होती. मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान लाईट आली असता रस्त्यावरील विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन मोठा जाळ झाला होता. याच दरम्यान संभाजी व चंद्रकांत चव्हाण यांच्या घरापर्यंत गेलेल्या वीज वाहिनीलाही शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली .
चव्हाण बंधूंचा शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय असून चांगल्या प्रतीच्या गाई व म्हशी यांचे पालन केले आहे . या जनावरांना पावसाळ्यासाठी खाद्य म्हणून घराच्या दुसऱ्या मजल्यावर वाळलेला चारा भरलेला होता. या चाऱ्यावर विजेच्या ठिणग्या पडल्याने चाऱ्यानं पेट घेतली . जनावरांच्या चाऱ्याच्या शेजारीच जळणासाठी ठेवलेली लाकडे , शेणी तसेच शेती कामाची लाकडी अवजरे यांना आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू असल्याने चव्हाण यांचे कुटुंबीय शेतामध्ये कामासाठी गेले होते .यामुळे घराचा दरवाजा बंद होता . दरम्यान चव्हाण यांच्या घरातून येणारे धुराचे लोट पाहून आजुबाजूच्या लोकांनी घरातील जनावरे सोडून बाहेर काढली .यामुळे जनावरांची जीवित हानी झाली नाही . कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्यानं आग विझवण्यात यश आले. नागरिकांच्या सतर्कतेमुळं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. चव्हाण बंधू शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे एक तरुण प्रगतशील शेतकरी व दूध उत्पादक म्हणून ओळखले जातात .यामुळे शेतीच्या मशागतीची विविध प्रकारची लाकडी अवजारे त्यांच्याकडे होती ती पूर्णपणे जळून आगीत खाक झालीत.या आगीमध्ये सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा तलाठी शर्मिला काटकर यांनी केला आहे.









