कोल्हापूर :
‘मधाचे गाव’ म्हणून ओळख असणाऱ्या भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथील मधाला जगभरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. शुद्ध व नैसर्गिक मधाचा दर्जा असल्यामुळे याला देश विदेशात मागणी आहे. राज्यभरात मधाचा व्यवसाय वाढावा, यासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी रूपयांच्या निधीची तरदुत करण्यात आली आहे. आता शासनाच्या नवीन धोरणामुळे कोल्हापुरच शुद्ध मध जगभरात पोहोचणार आहे.
कोल्हापुरातील पाटगाव व दाजीपुरात मध निर्मितीसाठी मधुबन तयार करण्यात येणार आहे. याबाबतच प्रस्ताव राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मधाचे उत्पादन वाढण्यास चालना मिळणार आहे. पाटगावमधील ‘मधाचे गाव’ ही योजना यशस्वी झाल्यामुळे आता आता दाजीपूरमध्येही हनी पार्क साकारणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकार राज्यातील 10 जिल्ह्यात ही संकल्पाना उभारली जाणार असुन यासाठी लागणारा निधी लवकरच वर्ग केला जाणार आहे. राज्यात यंदा एका वर्षात 54 टन शुद्ध मधाची निर्मिती झाली आहे. शुद्ध व नैसर्गिक अशी ओळख असणाऱ्या मधामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे याला मागणीही अधिक आहे.
पाटगाव परिसरात शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी आदी गावांमध्ये मधमाशीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पाटगाव परिसरात वर्षभरात 8 ते 10 टन मधाचे उत्पादन होते. येथील मध शुद्ध आणि नैसर्गिक असल्याने त्याला बाजारपेठेत विशेष मागणी आहे.
- शासनाकडून प्रोत्साहन
मध उत्पादन आणि विक्रीला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने 22 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे, त्यापैकी 14 कोटी 98 लाख रुपये वितरित झाले आहेत. याशिवाय, ‘मधाचे गाव पाटगाव’ या उपक्रमासाठी 31 लाख 71 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
- शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी
राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळातर्फे कोल्हापुरात ‘मधुबन’ तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे मधमाशीपालनाला प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. मधुबन प्रकल्पांतर्गत मध प्रक्रिया केंद्र, प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र आणि माहिती दालन उभारण्यात येणार आहे.
- जागतिक स्तरावर मधाची ओळख
पाटगावला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र मिळाले आहे. राज्यातील हे एकमेव गाव आहे. यामुळे पाटगावचा मध व पर्यटनाला जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होत आहे.
- परदेशात मागणी वाढणार
राज्य शासन आणि प्रशासन पाटगावचा मध जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी मधाची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगवर विशेष लक्ष दिले जात आहे. येथील शुद्ध आणि नैसर्गिक मधाला परदेशात मागणी वाढण्याची शक्यता आहे.








