Kolhapur Heavy Rain Update : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेली असून अनेक मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देखील कोल्हापूर विभागातील काही एसटी मार्ग बंद झाले आहेत. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील मांडूकली येथे पाणी आल्याने कोल्हापूर-गगनबावडा -पणजी मार्ग बंद आहे.
तसेच संभाजीनगर आगाराचे रंकाळा स्टॅन्ड इथून सुटणारी बुरांबाळ करंजवडे, पडसाळी, पाट पन्हाळा, बाजार भोगाव एसटी वाहतूक बंद आहे. या ठिकाणी गोटे पुलावर पाणी आल्याने हा वाहतूक मार्ग बंद करण्यात आला आहे. चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने त्या ठिकाणी चंदगड मधून हेरे, इब्राहिमपूर, पारगड हा वाहतूक मार्ग बंद आहे.









