कळंबा,प्रतिनिधी
Kolhapur Heavy Rain : गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधारेने शनिवारी हीच लय कायम ठेवल्याने कळंबा तलाव शनिवारी दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाला.सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांनी येथे गर्दी केली. 28 जुलैला यावर्षी पहिल्यांदा तलाव भरून सांडव्यावरून पाणी बाहेर पडले होते.आता सप्टेंबरमध्ये दुसऱ्यांदा शनिवारी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो झाला. सांडव्यावरून कोसळणारे पाणी पाहण्यासाठी आज सकाळपासून गर्दी वाढली आहे.
जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता.त्यापुर्वी तलावातील पाणीपातळी 19 फुटांवर होती.ती झपाट्याने वाढल्याने २७ फुटांवर पोहोचली होती.दरम्यान,गेली 15 दिवस पावसाने उघडीप दिली होती.तलावातील पाणी उपसा चालू असल्याने पाणी पातळी दीड फूट कमी झाली होती.गुरुवारी सुरू झालेल्या संततधारेने कात्यायनी टेकड्यातून वाहणारे सात नाले ओसंडून वाहू लागल्याने कळंबा तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली, परिणामी दुसऱ्यांदा शनिवारी तलाव ओव्हरफ्लो झाला.
तलावाच्या सांडव्यानजीकचा पूल कमकुवत झाला आहे. बंधारा खचला आहे. तलावाच्या मनोऱ्याला संरक्षक कठडा नाही,परिसरात पथदिवे नाहीत,अशा स्थितीत नागरीक,पर्यटकांनी धोका पत्करू नये.वर्षा पर्यटन करताना, पाणी पाहताना दक्षता घ्यावी,असे आवाहन महापालिका,कळंबा ग्रामपंचायत, करवीर पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर स्टेट्सला झळकू लागताच सांडव्याच्या पाण्याखाली वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तरूणाईने गर्दी केली आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
पावसाळ्यापूर्वी तलावात फक्त दोन फूट मृत पाणीसाठा शिल्लक होता, पण आता कळंबा तलाव दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाल्याने कळंबा गावसह शहराचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.