प्रतिनिधी,चंदगड
Kolhapur Heavy Rains : चंदगड तालुक्यात सलग दोन दिवस वळीव पावसाने वीजांच्या गडगडाटात जोरदार हजेरी लावल्यामुळे ऊस, मक्का, मिरची, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांना दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून हवेत उष्णतेचा पारा कमालीचा वाढला होता. शिवारातील विहिरींची पाणीपातळी खालावली होती. त्यामुळे ऊस, मक्का, भुईमूग, मिरची, बेनिस, बटाटा आदी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले होते. उष्णतेचा पारा कमालीचा वाढल्यामुळे सकाळी दहा पासूनच अंग घामाने भिजून जायचे. पायाखाली तापलेली जमिन वरून सूर्यप्रकाशाच्या तीव्र झळा सर्वांगाला झोबत असल्यामुळे शिवारात शेतकरी व मजूरांना काम करणे कठीण जात होते.
एप्रिल महिन्यात वळीव पावसाने हजेरी न लावल्यामुळे माळरानातील नांगरणी, कुळवणीची कामे लांबणीवर पडली. जून महिना तोंडावर आल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्यामुळे चिंतातूर झाला होता. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पहाटे आकाश ढगांनी व्यापून यायचे. पण वळीव पाऊस वारंवार हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. अचानक सोमवारी सायंकाळी व मंगळवारी दुपारी जोरदार वीजांच्या गडगडाटात वळीव पावसाने हजेरी लावल्यामुळे माळरानाबरोबर शिवारातून पाणीच पाणी झाले आहे. दोन-चार दिवसांची उघडीप मिळल्यानंतर पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना जोर येणार आहे. गेल्या महिन्याभरापासून पाण्याअभावी करपत जाणारी ऊस, मक्का, भुईमूग, बटाटे, बेनीस, मिरची आदी पिकांना वळीव पावसाने दिलासा दिल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गडहिंग्लजला वळीव पावसाने झोडपले
प्रतिनिधी,गडहिंग्लज
गडहिंग्लज शहर आणि परिसराला मंगळवारी रात्री 7 नंतर विजेच्या कडकडाटासह वळीव पावसाने झोडपले. सोसाट्याचा वाराही होता. शहरा लगतच्या भडगाव, जरळी, दुंडगे परिसरातही पाऊस झाला. मंगळवारी पहाटेही गडहिंग्लज परिसरात पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर उकाड्याने सारेजण हैराण झाले होते. रात्रीच्या पावसाने हवेत गारवा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते.
Previous Articleकृषीपंपाना मीटर नको, अन्यथा तीव्र आंदोलन
Next Article रेशन दुकानात आता ‘आपले सेवा केंद्र’









