गडहिंग्लज तालुक्यातील चित्र
प्रतिनिधी/गडहिंग्लज
परतीच्या पावसाने गडहिंग्लज तालुक्यात धुमाकूळ घातला असून मंगळवारी झालेल्या जोराच्या पावसाने हातचे आलेले सोयाबिनच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कमी कालावधीच्या भात पिकालाही या पावसाचा फटका बसला असून सुगीचा हंगाम रेंगाळल्याचे पहावयास मिळते.
गडहिंग्लज तालुक्यात ऊसापाठोपाठ सोयाबिनचे पीक घेतले जाते. जोराच्या पावसाने खरीपातील सर्वात मोठा फटका सोयाबिनला बसला आहे. यावर्षी सोयाबिनचा उताराही एकरी घटला असल्याने शेतकरी चिंतेत होता. त्यात गेले दोन दिवस सुरु असणाऱ्या पावसाने पुन्हा आलेले पिकही हातचे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भुईमुगही काढणीला आला आहे. पावसामुळे शेतात जाणे अवघडीचे झाल्याने शेतातील वेल पाऊस झेलत उसपण्याचे काम शेतकरी करताना दिसत आहेत. पावसाने उघडीप दिली तरच भुईमुगाचे पीक हाती लागणार आहे अन्यथा त्याचेही नुकसान सोसावे लागणार आहे. कमी कालावधीच्या भात पिकालाही फटका बसला आहे. उशिरा येणाऱ्या भातपिकाबरोबरच मिरची, नाचणा या पिकांना हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. आता शेतकरी मात्र पावसाच्या उघडिपीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहेत.
गडहिंग्लज तालुक्यातील लागवड क्षेत्र (हेक्टर)
सोयाबिन- 12,200
भात- 8,990
भुईमूग- 6,230