कोल्हापूर / प्रतिनिधी
जिल्ह्यातील माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणा-या 474 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात आल्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 28 च्या तरतुदीप्रमाणे नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा बोलविणे आवश्यक आहे. त्यासअनुसरुन (चनवाड ता. शाहुवाडी वगळून) ग्रामपंचायतींची पहिली सभा दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी घेण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले आहेत.
ज्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद रिक्त आहे अथवा उपसरपंच निवडणुकीकरीता अपरिहार्य कारणास्तव सरपंच उपस्थित राहण्यास असमर्थ असतील तर या कारणाची खातरजमा करुन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 33 मधील पोटकलम 6 (4) मधील तरतुदीस अनुसरुन पिठासीन अधिकारी यांची नियुक्ती संबंधित तहसिलदारांनी करावी.
ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेत केवळ उपसरपंच पदाच्या निवडणुकीचे कामकाज करण्यात येईल. उपसरपंच पदाच्या निवडीबाबतची कार्यवाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांच्याकडील महाराष्ट्र शासन राजपत्र व ग्रामविकास, जलसंधारण व वन विभाग यांच्याकडील राजपत्र अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्ण करावयाची आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 33 सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणुकीची कार्यपध्दती विषद करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादी संबंधित तहसिलदारांकडून प्राप्त करून ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेची नोटीस काढुन मुदतीत लागू करायची आहे, असेही प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी कळविले आहे.