संजीव खाडे, कोल्हापूर
ऐन लग्न सराईच्या तोंडावर सोने दरात वेगाने विक्रमी वाढ होत आहे.गुरूवारी कोल्हापूरच्या सोने-चांदी बाजारात (गुजरी) सोन्याचा प्रती तोळे दर जीएसटीसह तब्बल 57 हजार 700 रूपये इतका होता.गेल्या दोन महिन्यात सोने दरात प्रती तोळा 5 हजार 700 रूपयांची वाढ झाली आहे. गुरूवारच्या उच्चांकी दरवाढीनंतर ग्राहकांना हुडहुडी भरली असून गुजरीतील सराफ गारठले आहेत. जागतिक पातळीवरील मंदीसदृश्य वातावरणामुळे सोने दरात वाढ होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. नजिकच्या काळात सोने दर आणखीन वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये सोने दर पन्नासहजार रूपयांच्या जवळपास होता. 15 नोव्हेंबरच्या दरम्यान या वाढ होत गेली. 52 हजार पर्यंत दर पोहचला. त्यानंतर महिन्याभरात 15 डिसेंबरपर्यंत सोने दराने 54 हजारचा टप्पा गाठला. आता बरोबर महिन्याभराने 12 जानेवारीला हाच दर तब्बल 57 हजार 700 रूपयांपर्यत गेला. दोन महिन्यांच्या काळात 5 हजार 700 रूपयांची प्रती तोळा झालेली वाढ ग्राहकांना ऐन हिवाळ्यात हुडहुडी भरविणारी ठरली आहे.दरवाढी मागे जागतिक मंदी,शेअर बाजारातील घसरण,जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडी आणि युद्ध आदी कारणे असल्याचे तज्ञ मंडळी सांगत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून युरोपातील इंग्लंडसह इतर देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत.अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेलाही महागाई नियंत्रणात आणणे कठिण बनू लागले आहे.गेले वर्षभर सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध अजूनही संपलेले नाही. या सर्वांचा जागतिक अर्थकारणावर परिणाम झाला आहे. जागतिक पातळीवरील शेअरबाजारातही घसरण सुरू आहे.परकीय गुंतवणुकीवरही परिणाम झाला आहे.त्यामुळे सोने दरात दिवसे दिवस वाढ होत असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचे म्हणणे आहे.
व्यवहारावर परिणाम,विक्री 50 टक्के घटली
सोने दरातील उच्चांकी दरवाढीचा परिणाम सोने-चांदी बाजार पेठेवर झाला आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक विक्री घटल्याची माहिती गुजरीतील सराफ व्यावसायिक संग्रामसिंह साळोखे यांनी दिली. ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल कमी झाल्याने व्यापारावर परिणाम झाला आहे. सोन्याचे दागिने करणाऱया कारागिरांनाही फटका बसत आहे, असेही साळोखे यांनी सांगितले.
दुबई आणि सौदी अरेबियाचा प्रभाव
भारतातील सोने बाजारावर दुबईचा आणि पेट्रोल बाजारावर सौदी अरेबियाचा प्रभाव आहे. या ठिकाणी दर ठरत असतात. भारतीय बाजार पेठेत त्याची अंमलबजावणी होते.
गेल्या तीन महिन्यातील सोने दर
15 नोव्हेंबर : 52 हजार रूपये
15 डिसेंबर : 54 हजार रूपये
12 जानेवारी : 57 हजार 700 रूपये.
लग्न सराईच्या काळात सोने दर वाढत आहेत. त्याचा परिणाम व्यापारावर झाला आहे. नजीकच्या काळात सोने दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी विचारपूर्वक सोने खरेदी करावी.
राजेश राठोड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ
Previous Articleसावंतवाडी बस स्थानकासमोर आढळला तरुणाचा मृतदेह
Next Article कोयता गँगविरोधात गृहविभागाने तातडीने पाऊले उचलावीत









