गोकुळच्या सत्ताधाऱ्य़ांकडून वार्षिक सर्वसाधारण सभेत महादेवराव महाडिक यांनी हजेरी लावण्याचा संबंध काय असा प्रश्न विचारला जात आहे.मात्र आता सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा संबंध काय?असा प्रश्न विचारताना सतेज पाटलांना गोकुळचे कुठल्याही प्रकारचे ज्ञान नसल्याचे गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी म्हटले आहे. गोकुळ दुधसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या होत असून त्या पार्श्वभुमीवर विरोधी गटाच्या सचालकांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
शौमिका महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गोकुळच्या संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीवर टिका केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्य़ा, “गोकुळच्या सभेत महादेवराव महाडिक यांना हजर राहण्याचा संबंध काय? अशी विचारणा सत्ताधारी मंडळांकडून केली जात होती. मात्र आता सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा संबंध काय?” असा प्रश्न य़ावेळी त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या “अमूल हा ब्रँड पूर्वी एका तालुक्यापुरता मर्यादित होता. आता जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात अमूल पसरला आहे. जिल्ह्यात 1200 दूध संस्था नविन वाढवल्या गेल्या? त्या दुध संस्थांचे दूध कुठे गेलं? गोकुळच्या म्हैशीच्या दुधात 5 कोटी लिटरची घट झाली आहे, याचे कारण काय ? मुंबईमधील गोकुळच्या दूधाची विक्री कमी झाली आहे? याचंही त्यांनी उत्तर द्यावं. जे प्रश्न घेऊन सत्ताधारी सत्तेत आले आहेत ते प्रश्न सोडवले गेले का? उद्याच्या सभेत सत्ताधाऱ्यांनी शांततेने उत्तर द्यावित.” असेही त्या म्हणाल्या.
सत्ताधारी गटावर आरोप करताना त्या म्हणाल्या, “आम्ही सत्तेत असताना विरोधकांनी संघाच्या मालमत्तेच नुकसान केले. त्याच्यावर आणि माझ्यावर संस्कार वेगवेगळे आहेत, त्याच्यावर ते संस्कार नाहीत. त्यावेळी गोकुळ बचाव कृती समिती स्थापन झाली होती? ती आता कुठे गेली.” असा सवाल त्यांनी केला.
शेवटी बोलताना त्यांनी गोकुळमधील महाडिकांचे टँकर आणि ठेका यापलीकडे सतेज पाटलांचे ज्ञान नसून उद्या जर त्यांना वेगळा प्रश्न विचारला तर हेच सांगून जातील. त्यांना गोकुळमधील दुसरं कुठलही ज्ञान नसल्याचेही शौमिका महाडिकांनी म्हटले आहे.









