सभेच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली
कोल्हापूर : सन 2024-25 या वर्षातील उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. यामुळे मंगळवारी होत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत व्यासपीठावर जाणार नाही. सभा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य राहील, असे गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
गोकुळ दूध संघाची मंगळवारी सर्वसाधारण सभा होत आहे. यामुळे या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुतीचा चेअरमन असल्यामुळे विरोधी गटातील संचालिका शौमिका महाडिक व्यासपीठावर जाणार का याकडेही लक्ष लागून राहिले होते. मात्र सभेच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
शौमिका महाडिक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला व्यासपीठावर जाणार नसल्याचे म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांवर तोफ डागतानाच आपण व्यासपीठावर का जाणार नाही याची कारणमीमांसा केली. गोकुळची आज सर्वसाधारण सभा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी होणार आहे.
दुपारी 1 वाजता श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल हातकणंगले औद्योगिक क्षेत्र याठिकाणी सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी केले आहे. आम्ही आतापर्यंत जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांचे निरसन झालेले नाही. त्यामुळे सभेत व्यासपीठावर बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या जाहिरातीला ५६ हजार रुपये खर्च येतो त्यासाठी गोकुळमधून २ लाख रुपयांचे बिल निघते.
अशा कोट्यवधींच्या जाहिराती वर्षभरात दिल्या असल्याचे महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार अशोकराव माने, माजी संचालक विश्वास जाधव, भाजपचे करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील, प्रताप पाटील-कावणेकर, रविश पाटील-कौलवकर उपस्थित होते.
संचालक वाढीला विरोध
संचालकांची संख्या वाढवून होणाऱ्या खर्चात आणखी भर घालू नये. संचालक वाढीला आमचा विरोध राहील, असे त्यांनी
म्हटले आहे. गोकुळमध्ये महायुतीची सत्ता असताना अहवालामध्ये महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो छापलेला नाही. व्यासपीठावर जाण्यासंदर्भात आपण वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून कार्यकर्त्यांशी सुद्धा बोलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोकुळच्या सभेबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आजपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
चेअरमन यांना पूर्ण सहकार्य
शौमिका महाडिक म्हणाल्या, गेल्या चार वर्षांपासून मी विरोधी गटाची संचालिका म्हणून काम केले आहे. पाच वर्ष विरोधी संचालिका म्हणूनच काम करावे लागेल, असे वाटले होते. मात्र, राजकारणामध्ये परिस्थिती एकसारखी राहत नाही. आमच्या विरोधकांप्रमाणे आम्हाला दोन्ही दगडावर हात ठेवून राजकीय फायदा घेता येत नाही. त्यामुळे ही सभा शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सहकार्य असेल. आमचा आक्षेप हा २०२३-२४ या आर्थिक वर्षात झालेल्या व्यवहारांवर असून मागच्या कारभाराचे खापर नवीन चेअरमनांवर फोडणार नाही.
सात वर्षानंतर पहिल्यांदाच सभा शांततेत होणार
यापूर्वी गोकुळ दूध संघाची सभा मल्टिस्टेटवरुन वादळी होत होती. यानंतर २०२१ साली गोकुळमध्ये सत्तांतर झाले. यानंतरही सभा वादळीच झाली. चार महिन्यांपूर्वी गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी गटाच्या संचालिका महाडिक यांनी सभा शांततेत होण्यासाठी सहकार्य करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. यामुळे पहिल्यांदाच गोकुळची सभा शांततेत पार पडणार आहे.








