सचिन बरगे कसबा बावडा
‘गोकुळ’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधकांच्या ‘मंजूर ना मंजूर’च्या गोंधळात सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. गोकुळच्या राजकारणात पाटील-महाडिक गटातील संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळाला. याचे पडसाद छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या वार्षिक सभेत उमटणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, गोकुळ दूध उत्पादक संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची गेली अनेक वर्षे सत्ता होती. गेल्या निवडणुकीत महाडिक यांच्या मुख्य राजकीय केंद्राला सुरुंग लावत ‘गोकुळ’मध्ये आमदार सतेज पाटील गटाने सत्तांतर घडवले. अन् आमदार सतेज पाटील यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. ‘गोकुळ’मधला हा पराभव महाडिक गटाला किती जिव्हारी लागला, हे नुकत्याच झालेल्या ‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत दिसून आले.
गोकुळ दूध संघात सत्ताधारी सतेज पाटील तर विरोधी महादेवराव महाडिक गट आहे. याउलट छत्रपती राजाराम साखर कारखान्यात सत्ताधारी महाडिक व विरोधी पाटील गट आहे. त्यामुळे ‘गोकुळ’च्या वार्षिक सभेतील गोंधळाची पुनरावृत्ती आता छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत होण्याची शक्यता आहे.
पाटील-महाडिक गटातील संघर्ष कोल्हापूर जिह्याला सर्वश्रुत आहे. जिह्यात कोणतीही निवडणूक असो पाटील-महाडिक गट एकमेकांविरुद्ध ठाकलेले असतात.
एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील गटाने राजाराम कारखान्यात सत्तांतर घडवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, न्यायालयीन लढाई लढली, पण केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षातील महाडिक गटाने पाटील यांचे सर्व वार परतवून लावले. बोगस 1346 सभासदांपैकी प्रादेशिक साखर सहसंचालकांनी त्यापैकी 1272 सभासद अपात्र असल्याचा निर्णय काही दिवसांपुर्वी दिला. तत्पूर्वी या अपात्र सभासदांनी एप्रिलमध्ये झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मतदानास पात्र असल्यामुळे महाडिक गटास त्याचा फायदा झाला. हीच दूरदृष्टी ठेवून राजकारणात मातब्बर असलेल्या महाडिक यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वाढ केली आहे. अपात्र सभासदांना वेगळ्या मार्गाने कारखान्याच्या कारभारात समाविष्ट करून घेतले आहे.
छत्रपती राजाराम साखर कारखान्यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गेली 27 वर्षे एकहाती सत्ता आहे. कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सर्व जागा जिंकत महाडिक यांनी कारखान्यावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. ‘गोकुळ’मधील सत्तांतराचा सल मनात ठेवून नुकत्याच झालेल्या ‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत महाडिक गटाने विरोधकांची भूमिका उत्कृष्ट बजावली. त्याचेच पडसाद आता राजाराम कारखान्याच्या 39 व्या वार्षिक सभेत सतेज पाटील गटाकडून विचारलेल्या प्रश्नामध्ये उमटणार असण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, कारखान्याच्या 1346 सभासदांच्या सभासदत्व सिद्ध करण्याचा निर्णय प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिला असून त्यापैकी 1272 सभासद हे त्यांनी अपात्र ठरवले आहेत. पण या अपात्र सभासदांनी निवडणुकीदरम्यान प्रादेशिक साखर सहसंचालकाच्या निर्णयाअभावी मतदान पात्र असल्याने मतदान केले होते. यातही अपात्र ठरवलेल्या सभासदांत महाडीक कुटुंबातील 10 जणांचा समावेश आहे. या अपात्र सभासदांना पुन्हा पात्र बनवण्यासाठी कारखाना प्रशासनाने कार्यक्षेत्र वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याच मुद्यावर राजाराम कारखान्याच्या वार्षिक सभेत आरोप, प्रत्यारोप होत ही सभा रंगणार, अशी चिन्हे दिसत आहेत.