जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध संस्थामागून कर्जे घेऊन गोठे उभारले आहेत. त्यानंतर आलेल्या लंपी आजाराने अनेक दुभती जनावारे दगावली असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच गोकुळ दुधसंघाने दुधाच्या दरात केलेल्या कपातीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे गोकुळ दुधसंघाने ही दरकपात मागे घ्यावी अन्यथा जिल्हाभरात दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन उभारले जाईल असा इशारा कसबा बीड, बहिरेश्वर, म्हारुळ आदी परिसरातील दूध उत्पादक सभासदांनी गोकुळच्या प्रशासनाला दिला.
दुध उत्पादकांनी गोकुळच्या कोल्हापूरातील प्रधान कार्यालयावर आंदोलक करत गोकुळच्या या निर्णयाचा निषेध करून घोषणा दिल्या.
हेही वाचा >>> गोकुळतर्फे गायीचे दूध दर कमी केल्याबद्दल कसबा बीड येथे दूध उत्पादकांची बैठक संपन्न
यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी म्हणाले, “गोकुळने केलेल्या दरकपातीचा निषेध करून ही अन्यायी दरकपात मागे घ्यावी यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. गोकुळने दुधाच्या दरामध्ये केलेली घट ही अन्यायी आहे. शेतकऱ्यांनी, युवकांनी अनेक संस्था, तसेच आण्णासाहेब पाटील अर्थिक महामंडळातर्फे कर्जे घेऊन गोठा प्रकल्प उभे केले आहेत. पशुखाद्यामध्ये झालेली वाढ, दुभत्या जनावारांवर लंपी रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच गोकुळ दुधसंघाने सर्वसाधारण सभेपुर्वी 2 रूपयांनी तर सभेनंतर 2 रुपयांनी अशी 4 रूपयांनी घट करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले.
पहा VIDEO >>> गायीच्या दुधाचे दर पूर्ववत न झाल्यास अमूल मध्ये जाण्याचा दिला इशारा…
पुढे बोलताना सुर्यवंशी म्हणाले “ही दरकपात मागे घ्यावी यासंबंधीचे निवेदन देण्यासाठी आम्ही गोकुळच्या अध्यक्षांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. या अन्यायी दरकपात जर मागे घेतली नाही तर त्याविरूद्ध आम्ही आंदोलन उभा करू. तसेच लंपीमुळे दुभती जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना गोकुळतर्फे 10 हजार रूपयांचे अनुदान देण्यात यावे. यासह अनेक मागण्या आम्ही अध्यक्षांना निवेदन देऊन केल्या आहे.” असेही ते म्हणाले.
शेवटी बोलताना त्यांनी “गोकुळ ही शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. ती वाचली पाहिजे. जिल्ह्यात अनेक दुसऱ्या संस्था तयार झालेल्या आहेत. खाजगी संस्थांबरोबर जर गोकुळ दुधदर देत असेल तर शेतकरी नक्कीच सुखावेल. गोकुळपासून शेतकरी वर्ग बाजूला जाऊ नये यासाठी गोकुळने ठामपणे उभे राहीले पाहीजे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी गोकुळचे अध्यक्ष अरूणकुमार डोंगळे याच्यासह संचालक विश्वासराव पाटील (आबाजी ) यांनी निवेदन स्विकारले.