सुधाकर काशीद कोल्हापूर
गणेशोत्सवात जल्लोष सुरू आहे, ढोल-ताशाचा कडकडाट तर कानातच बसला आहे. जरूर त्याचा सूर प्रमाणापेक्षा वाढत आहे. पण जेव्हा या ढोलाच्या आवाजाचा कानोसा घेऊ, तेव्हा हा आवाज ढोलाचा तर आहेच, पण या आवाजामध्ये ढोल वाजवणाऱ्या पोरांच्या मनातल्या धडपडीचा एक सुर दडला आहे. कोल्हापुरात ग्रामीण भागातून येऊन गणेशोत्सवात ढोल वाजवणारी ही पोर धंदेवायिक नाहीत. पण या उत्सवात ढोल वाजवून त्यातून होणाऱ्या कमाईतून आपल्या कुटुंबाची दसरा, दिवाळी समाधानात साजरी व्हावी, या हेतूने या पोरांची ही धडपड आहे.
कोल्हापुरातल्या गंगावेश चौकात अशा पोरांचे किमान 50 ग्रुप आता दहा दिवस मुक्काम ठोकूनच आहेत. जिह्याच्या ग्रामीण दुर्गम भागातून आलेली ही पाच, सहाशे पोरं म्हणजे एकूण सामाजिक परिस्थितीचा आवाज आहेत.
ढोल वाजवायला आलेली ही पोरं राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, आजरा, भुदरगड, गगनबावडा तालुक्यातल्या दुर्गम भागातील आहेत. उत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर व आसपासच्या भागात ढोल वाजवायचा व झालेली कमाई वाटून घ्यायची, या हेतूने ही पोर आली आहेत. सोळा-सतरा वर्षापासून ते 30 32 वयापर्यंतची ती आहेत. घरची परिस्थिती बेताची. शेती, रोजगार व गुराढोरांवर त्यांचे कुटुंब चालते. त्यामुळे आपला भार कुटुंबावर नको म्हणून या पोरांनी गावागावात ढोल पथके काढली आहेत.
दहा-पंधरा ढोल, चार ताशे, चार झांज एवढे त्यांचे भांडवल त्यांनी इकडून तिकडून गोळा केले आहे. त्यांच्यातील दोघे तिघे म्होरके आहेत. ते ढोल वाजवण्याची सुपारी घेतात, पोरांना टेम्पोतून नेतात आणून सोडतात. फक्त दोन तीन तासांची सुपारी, असे सांगितले जात असले तरी त्यात त्यांचा सारा दिवस जातो. पण कमाईचा साडेतीनशे रुपये वाटा हातात पडतो. ही पोरं ढोल पथकात आहेत. घाम फुटेपर्यंत ढोल वाजवतात. रात्री गंगावेशीतच कुठेतरी मुक्काम करतात. एकवेळ जेवण, एकवेळ वडापाव, अधूनमधून तरतरी येण्यासाठी चहा यावर त्यांचा दिवस आहे. पण दहा-बारा दिवस असे राबले तर पुढचा दसरा, दिवाळी आपण व आपले कुटुंब आनंदाने साजरी करू, याचा त्यांना अंदाज आहे.
या पोरांनी गणेश आगमनाच्या निमित्ताने बऱ्यापैकी कमाई केली. अजूनही कोल्हापुरात गणेश आगमनाच्या मिरवणुका सुरू आहेत. त्यामुळे रोज एक तरी त्यांना सुपारी आहेच. आता विसर्जन मिरवणुकीचा दिवस महत्त्वाचा आहे. त्याची सुपारी ठरवण्याची त्यांची धडपड सुरू आहे. त्या दिवशी सगळ्यात मिळून पंधरा ते वीस हजार रुपये मिळावेत, या अपेक्षेने गंगावेशीत ते बसून आहेत. मंडळाचे कार्यकर्ते तेथे येतात, चौकशी करतात. घासाघीस करून दहा, बारा हजारांत त्या ढोलवाल्यांना ठरवतात.
ढोलवाल्या पोरांचा गेले सहा दिवस गंगावेशीतील रस्त्याकडेलाच मुक्काम आहे. रस्त्यावर त्यांनी ढोलावर ढोल रचून ठेवले आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी तर ठरलेल्याच आहेत. पण हे सगळे गृहीत धरून ही पोरं तिथे बसून आहेत. ही पोरं गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांची आहेत. व्यावसायिक ढोल ताशा पथक व या पोरांच्या ढोल पथकात खूप मोठा फरक आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयावरचे देखावे आहेत. पण गंगावेशीत ढोल ताशा मांडून बसलेली ही पोरं म्हणजेच वास्तवतेचा सजीव देखावा आहे. गणेशोत्सवाची घरात बसून बरी वाईट निरीक्षणे नोंदवणाऱ्यांनी गंगावेशीत एकदा येऊन या पोरांशी बोलले तर गणेशोत्सवाचा एक दडलेला पैलू त्यांना डोळ्यासमोर पाहायला मिळणार आहे. ढोलाच्या आवाजापेक्षा तो पैलू थेट काळजाला जाऊन भिडणारा आहे.