उचगाव / वार्ताहर
करवीर तालुक्यातील गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी अरुण शिरगावे यांचे सदस्यपद अपात्रतेप्रकरणीचे अपील अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी फेटाळले असुन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचा अश्विनी शिरगावे यांना अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला आहे. या संबंधीचा निकाल शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त, पुणे यांनी दिल्याची माहिती गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तीन महिन्यापूर्वी सरपंच अश्विनी शिरगावे व अन्य दोन सदस्यांनी आमदार सतेज पाटील गटात जाहीर प्रवेश केला होता. पण त्यानंतर गायरान जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे यांना १६ जून रोजी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी अपात्र घोषित केले. तसेच सरिता कांबळे या पुन्हा महाडिक गटाकडे परतल्यानंतर ग्रामपंचायतीवर महाडिक गटाचीच सत्ता कायम राहीली.
यावेळी माहिती देताना उपसरपंच तानाजी पाटील म्हणाले, “देवदर्शनासाठी बाहेर गेल्याची संधी शोधून विरोधी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने खेळलेला हा डाव पूर्णपणे फसला आहे. सरपंच शिरगावे यांनी गायरान जागेवर अतिक्रमण केले. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सदस्य अपात्रतेचा निर्णय दिला. या निर्णयाविरोधात सरपंच शिरगावे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे, तसेच उच्च न्यायालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती मिळवली होती. त्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांनी सरपंच अश्विनी शिरगावे यांचे अपील फेटाळून जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “जनतेने आम्हाला बहुमत दिले आहे. सध्याच्या घडामोडीत ग्रामपंचायत महाडिक गटाचीच सत्ता असून राज्यात सत्तांतर झाल्यानंतर खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात निधी गावासाठी आणला आहे. याची धास्ती घेऊन विरोधकांनी खालच्या पातळीला जाऊन राजकारण करत हा सर्व खेळ खेळला आहे. पण यात ते अपयशी ठरले असून, येथून पुढच्या काळात तरी विरोधकांनी नैतिकता पाळून राजकारण करावे असा उपरोधिक टोलाही तानाजी पाटील यांनी यावेळी लगावला.
या पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र यशवंत, अशोक दांगट, अमित माळी, सुधाकर पाटील, संजय सोनुले, रामचंद्र शिरगावे, सुरज कांबळे, दादा धनवडे, संजय सातपुते, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.