प्रतिनिधी/गडहिंग्लज
अमर रहे, अमर रहे जवान उदय घुगरे अमर रहे, अशा जयघोषात गडहिंग्लज तालुक्यातील जरळीच्या सुपुत्रावर बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बेळगावच्या मराठा लाईट इंन्फट्री बटालियनकडून अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी हजारो ग्रामस्थ, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्तेच्या उपस्थितीत लाडक्या जवानाला निरोप दिला. जवान घुगरे यांचे वडील माजी सौनिक महादेव घुगरे यांनी भडाग्नी दिली.
उत्तराखंड येथील पितोरागड येथे सैन्यात सेवा बजावताना रविवारी सकाळी उदय घुगरे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. हे वृत्त समजताच घुगरे कुटूंबियासह जरळी पंचक्रोशीत शोककळा पसरली होती. अखेर तीन दिवसांनी जवान घुगरे यांचे पार्थिव बुधवारी सकाळी पुण्याहून शासकीय वाहनाने जरळी या मुळगावी आणण्यात आले. यावेळी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर फुलांची रांगोळी रेखाटली होती. जवान उदय घुगरे अमर रहे, भारत माता की जय या घोषणांनी आसमंत दुमदुमला. मिरवणूक मार्गावर पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. जवान घुगरे यांच्या राहत्या घरासमोर आल्यानंतर कुटूंबियाना पार्थिंवाचे दर्शन देण्यात आले. यावेळी कुटूंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा होता.
अंत्यसंस्काराच्या चौथऱ्याच्या चारी बाजूला रांगोळी काढली होती. चौथऱ्यावर झेंडूच्या फुलांच्या माळा लावल्या होत्या. यावेळी विविध मान्यवरांनी जवान उदय यांना श्रद्धांजली वाहिली. मराठा बटालियनकडून 5 फैऱ्या झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.