अभिजीत खांडेकर- तरुण भारत
पश्चिमघाटामध्ये (Western Range ) अनेक गड, किल्ले आहेत. हे गड किल्ले छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात. निसर्गाची भव्यता आणि आपल्या पुर्वजांचा वारसा अनुभवण्यासाठी गडकोट आणि किल्ल्यासारखे पर्यटनस्थळ असूच शकत नाही. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक गडकिल्ले आहेत. त्यांच्या तत्कालिन उपयोगितेवरून, स्थानावरून, नैसर्गिक विविधतेवरून त्यांची वैशिष्ट्ये बदलत जातात.
आज आपण सामानगड ( Samangadh ) या कोल्हापूर ( Kolhapur )जिल्ह्यातल्या एका महत्वाच्या गडाविषयी जाणून घेणार आहोत. सामानगड कोल्हापूर जिल्ह्यात असणऱ्या अनेक महत्वाच्या आणि निसर्गाने समृध्द अशा किल्ल्यापैकी एक गणला जातो. पन्हाळा, विशाळगड, भुदरगड आणि रांगणा या किल्ल्यांच्या मधोमध सामानगड आहे. इतिहासतज्ञांच्या मते बाकीच्या किल्ल्यांना मदत पोहोचवण्याठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असल्याने याचे नाव सामानगड असे पडले असावे.
शिलाहार राजा भोज द्वितीय यांनी कोल्हपूर जिल्ह्यात अनेक किल्ले बांधल्याचे आपणास दिसून येतात. सामानगडसुद्धा राजा भोज द्वितीय यांनी बांधला. १६६७ साली शिवरायांनी हा किल्ला जिंकून गडाच्या देखभाल आणि रक्षणाची जबाबदारी अण्णाजी दत्तो यांच्याकडे दिली. आण्णजी दत्तो शिवाजी महाराजांच्या अष्ट प्रधान मंडळातील एक प्रमुख आणि मातब्बर आसामी होते. तसेच त्याच्य़ाकडे दक्षिण सुभ्याची विशेष जबाबदारी होती.
कसे जाल सामानगडला ?
कोल्हापूर जिल्हातील सधन आणि समृद्ध तालुक्यांपैकी एक असलेल्या गडहिंग्लज तालुक्यात सामानगड हा किल्ला आहे. गडहिंग्लजवरुन भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पायथ्याशी पोहचू शकतो. चिंचेवाडी हे गाव ऐतिहासिक आहे. या गावात असणाऱ्या मोठ्या विहीरीवर असणाऱ्या तोफांवरून याची प्रचिती येते. चिंचेवाडी गावातून वाहेर पडल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. त्यातील एक रस्ता मारूती मंदीराकडे तर दुसरा रस्ता गडावर जातो.
गडाच्या पायथ्य़ाशी अगोदर एक मोठी कमान होती, पण काळाच्या ओघात तिचे फक्त अवशेष शिल्लक राहिलेत. सामानगडाची अनेक वैशिष्ठे आपणास पाहताच क्षणी लक्षात य़ेतात. त्यापैकी एक म्हणजे गडाची नाविण्यपूर्ण बांधणी. गडाची बांधणी एका फोडून काढलेल्या काळ्या खडकावर झाली आहे. काळा खडक तासून काढून त्यावर गडाची तटबंदी आणि बुरूज बांधले आहेत हे आपणास प्रकर्षाने जाणवते.
गडावर पोहोचल्यावर डाव्या बाजूने गडाच्या तटबंदीवर जाता येते, तर उजव्या बाजूच्या रस्त्याने पुढे गेल्यावर आपणास एक विहीर लागते. जांभ्या दगडात खोदलेली ही विहीर चौकोनी असून विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या वहिरीजवळ आल्यावर गडावर पोहोचल्याचा विलक्षण आनंद होतो.
सामानगडावर आपणास एक वैशिष्ठ्यपुर्ण गोष्ट पहायला मिळते. विहिरीजवळून पुर्व दिशेला चालत गेल्यावर अंबाबाईचे कौलारु मंदिर लागते. मंदिराला लागूनच बुजलेली पाण्याची टाकी व चौथरे आहेत. अंबाबाई मंदिरापासून तसेच पुढे गेल्यावर सुंदर पायऱ्या असणारी एक विहीर लागते. तीला स्थानिक भाषेत ‘कमान बाव’ म्हणून ओळखतात. या विहीरीच्या पायर्यांवर सुंदर आणि लक्षवेधक कमानी आहेत. विहीर म्हटल्यावर प्रथमता आपणास पाण्याची विहीर वाटत असली तरी पुर्वी या ठिकाणी कैद्यांना ठेवले जात होते.
गडाच्या मागील तटावरुन बाहेरच्या बाजूस आठ ते दहा फूट उंचीचे जांभ्या दगडाचे उभे खांब आपले लक्ष वेधून घेतात. हे दगडी खांब का आणि कशासाठी बांधले होते याचे कारण अजूनही कोणत्याच इतिहसतज्ञांना आणि गडकोट प्रेमींना सांगता आले नाही. तटवरून तसेच पुढे चालत गेल्यावर चोर दरवाजा आणि मग शेवटी चिलखती सोंडया बुरुज लागतो. सोंडया बुरुजासमोर मुघलांनी बांधलेली मुगल टेकटी दिसते. गडावर असणाऱ्या मारुती मंदिरासमोर आपणास लेणी आढळतात.
सामानगडाच्या अलेक वैशिष्ट्यांपैकी त्याची ऐतिहासिक साक्षही अत्यंत महत्वाची आहे. सामानगडावर असलेल्या ऐतिहासिक ठिकाण पाहीले का आपणास प्रचिती य़ेते. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या शौर्याची साक्ष सामानगड देतो. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे इतर ६ सहकारी बेहलोल खानच्या लाखो सैन्यांवर चालून गेले. खानाच्या सैन्यावर सात मराठे ज्या ठिकाणाहून दौडत गेले ते ठिकाण म्हणजेच सामानगड. केवळ शिवाजी महाराजांवर असणाऱ्या निष्ठेपाय़ी येथूनच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’
शिवकालीन इतिहासाबरोबरच या गडाला ब्रिटीशकालीन इतिहास सुद्धा आहे. ब्रिटिशांनी जेव्हा कोल्हापूर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध बंड प्रथम सामानगडावरच झाले. ब्रिटिशाविरूद्धच्या बंडाचा झेंडाज्या ठिकाणी फडकवला तो बुरूज झेंडा बुरूज या नावाने ओळखला जातो.
वेताळ बुरुज हा इंग्रजांच्या केलेल्या आक्रमणाची आणि विध्वंसाच्या गोष्टी सांगतो. मराठ्यांकडून जेव्हा हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यावेळी त्याची खुपच नासधूस आणि पडझड झाली.
सामानगडावर असणाऱ्या वैशिष्ट्यपुर्ण विहीरी हे त्याची विशेष ओळख आहे. गडावर दोन विहीरी असून एक सातकमान विहीर आणि दुसरी साखर विहीर अशी नावे आहेत. त्यांच्या रचना आणि मांडणी दोन्ही आकर्षक आहेत.
आंधारकोठडी नावाच्या वास्तूमध्ये पुर्वी कैद्यांना ठेवले जात असे. जमिनीखली खोदलेल्या खोल्यामध्ये अंधार पोहोचणे केवळ अशक्य अशी त्याची रचना आहे.
संकटकालिन परिस्थितीमध्ये गडावरून खाली उतरण्यासाठी आणि गनिमीकाव्याने शत्रूंवर चाल करण्यासाठी गडावरील चोरखिंडीचा वापर केला जात असे.
गडावर धान्य साठवण्यासाठी जमिनीखाली मोठी कोठरे असून शिवकालीन धान्यसाठा प्रणाली आणि रसदपुरवठा याची वेगळी ओळख करून देतो
असा हा सामानगड आपल्या भौगोलिक स्थिती आणि एतिहासिक वारसांमुळे नेहमीच वेगळेपण जपतो आहे.