सुधाकर काशीद ,कोल्हापूर
Kolhapur Football News : फुटबॉलमध्ये इर्षा असतेच. ही ईर्षा नक्कीच खेळाडूंना व त्या संघाला बळ देत असते. पण संपूर्ण सामना क्षणाक्षणाला रंगत गेला असताना सामना संपल्याची शिट्टी वाजताच ही इर्षाही संपली पाहिजे असा या फुटबॉलचा लिखित संकेत आहे. पण कोल्हापुरात मैदानावरचा फुटबॉल संपला की इर्षा संपण्याऐवजी ती ईर्षा अधिक उफाळून कशी येईल यावर ठरवून काही घटकांकडून भर दिला जात आहे .आणि याच नको इतक्या इर्षेतून फुटबॉलचे रूपांतर बॉक्सिंगमध्ये झाले आहे. कोल्हापूरचा फुटबॉल खेळ जपण्यासाठी आहे? की ईर्षा अस्मितेचे निखारे कायम फुलवत ठेवण्यासाठी आहे? याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसात फुटबॉल मैदानावरच्या घटना व त्यानंतरही त्याचे उमटणारे पडसाद पाहून ‘कशाला पाहिजे असला फुटबॉल’ अशीच उद्वेग जनक प्रतिक्रिया जाणकार फुटबॉल शौकिनातून व्यक्त होत आहे.
फुटबॉल मैदानावरची काही खेळाडूंची पंचा सोबत हुज्जत, पंचाच्या एखाद्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी होणारी शिवीगाळ, सामना संपल्यानंतर समर्थकांची होणारी हाणामारी, त्यातून निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्यामुळे फुटबॉल स्पर्धेबद्दलचे वातावरण काहींनी अगदी गढूळ करून टाकले आहे. वास्तविक तीन चार लाख रुपयांची वेगवेगळी बक्षीसे आहेत. दिमाखदार संयोजन, कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे हिरवेगार शाहू स्टेडियम आणि गोव्यात कलकत्त्यात नसेल एवढी सामना पाहण्यासाठी होणारी उदंड गर्दी. असे फुटबॉलला पोषक असे वातावरण कोल्हापुरात आहे. पण स्पर्धेच्या, सामन्याच्या आडून अस्मितेचे निखारेच जाणीवपूर्वक काही जणांकडून फुलवत ठेवले जाऊ लागले आहेत. आणि क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या सामन्यात पुढच्या क्षणी काहीतरी विपरीत घडेल की काय असेच काळजी वाटण्यासारखे वातावरण तयार झाले आहे.
कोल्हापूरची फुटबॉल परंपरा थेट शाहू राजर्षि शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज , शहाजी महाराजांच्या काळाशी जाऊन भिडणारी आहे. पॅलेस टीमच्या माध्यमातून या फुटबॉलला त्या काळात राजाश्रयही मिळाला आहे. शहरातील शिवाजी पेठ ,मंगळवार पेठ ,बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ, शाहूपुरी, फुलेवाडी या पेठा व तालमीबरोबरच कोल्हापूर महापालिका, कोल्हापूर पोलीस, एसटी महामंडळ, मेनन अँड मेनन, रिक्षा असोसिएशन यांनीही आपापलेसंघ तयार करून फुटबॉलला बळ दिले आहे. त्यामुळे कोल्हापुरातला फुटबॉल इतका रुजला की, फुटबॉल ची क्रेझ असलेल्या परिसरात नवजात बालकाच्या पाचवीलाच फुटबॉल पूजला जाऊ लागला. कोल्हापुरातील विविध पेठा तालमीतील या फुटबॉल संघात रांगडे पण जिद्दीचे खेळाडू आपली पदर मोड करत खेळत राहिले. कसलाही कोचिंग कॅम्प नाही. चांगल्या कंपनीचा पायात बूट नाही. मैदानात हिरवळ नाही. फुटबॉल खेळल्यामुळे आयुष्यात नोकरीची स्थिरता येईल याची कसलीही खात्री नसताना या जुन्या जाणत्या खेळाडूंनी फुटबॉल वाढवला. रुजवला. जरूर त्यावेळीही संघा संघात इर्षा होती. पण त्याला पेठेची अस्मिता, तालमीची अस्मिता असे स्वरूप आले नव्हते. त्यामुळे मॅच संपली की इर्षेचाविषय तिथेच संपत असे.
आज कोल्हापूरच्या फुटबॉलला जरूर झगमगाट आला आहे. एक संपली की दुसरी स्पर्धा सज्ज आहे. लाखाच्या घरात बक्षिसे आहेत. वास्तविक या जोडीला खिलाडूवृती वाढायला हवी होती. पण झगमगाट जास्त आणि खिलाडू वृत्ती कमी झाली आहे. वास्तविक नवे नवे संयोजक रिस्क घेऊन स्पर्धा भरवण्यासाठी पुढे येत आहेत. त्याचा फायदा खेळाडूंनी करून घ्यायची आवश्यकता आहे पण माझी तालीम, माझी पेठ या अस्मितेतच खेळाडू अडकून पडले आहेत. शाहू स्टेडियमच्या बाहेर फुटबॉलचे एक विस्तीर्ण जग आहे हेच बहुतेक जण विसरून गेले आहेत. स्पर्धेत हार जीत असतेच. पण हार मान्य करणे हा काही समर्थकांच्य दृष्टीने अपमान मानला जात आहे. आणि तेथेच स्पर्धेची गणिते बिघडली गेली आहेत. वाद झाला की कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने खेळाडू संघप्रमुख यांची बैठक व त्या बैठकीत मालोजीराजे छत्रपती यांचे आग्रहपूर्ण आवाहन ठरले आहे. पण बैठकीत तेवढ्यापुरते हो, व पुढे जे करायचे ते करायचे अशी काही ठराविकांची भूमिका आहे. शांतता बैठकीत तेच आणि दंगा भडकवायलाही तेच अशी दुहेरी भूमिका बजावणारेही काहीजण आहेत. या साऱ्यामुळे ‘कशाला हवा असला फुटबॉल’ अशीच उद्वेगजनक प्रतिक्रिया लोकांच्यात आहे. जी कोल्हापूरच्या फुटबॉलपरेला छेद देणारी ठरणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









