प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Football News : शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यावेळी बीजीएम स्पोर्टस् आणि झुंजार फुटबॉल क्लबच्या खेळाडूमध्ये किरकोळ कारणावरून मैदानावरच वादावादी झाली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. एकमेकांवर धावून जात जोरदार हाणमारी केली. हा राडा रोखताना पंचांची चांगलीच तारांबळ उडाली. स्टेडियमवरील वातावरण तणावपूर्ण झाले. दरम्यान, पंचांनी दोन्ही संघांच्या प्रत्येकी दोन अशा चार खेळाडूंना रेडकार्ड दाखवत मैदानाबाहेर काढले.
सामना संपण्यासाठी काही मिनिटांचा वेळ बाकी असतानाच अचानक दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. खेळाडू अर्वाच्य शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले. बघता-बघता जोरदार हाणामारी सूरू झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. मैदानावर खेळाडूंमध्ये राडा सुरू असतानाच प्रशिक्षक बसलेल्या ठिकाणीच राखीव खेळाडूंमध्येही हाणामारी सुरू झाली. सुमारे 10 ते 15 मिनिटे गदारोळ सुरू होता.संयोजन समिती व केएसएकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही दोन्ही संघाचे खेळाडू जुमानत नव्हते. अखेर दोन्हीकडच्या वरिष्ठांनी याची दखल घेत वाद मिटवला. सामन्याला पुन्हा सुरूवात झाली. पण तरीही एकमेकांना बघुन घेण्याची भाषा वापरण्यात येत होती.
समर्थकही मैदानावर,केएसए कार्यालयाबाहेर तणाव
खेळाडूमध्ये हाणमारी सुरू असतानाच दोन्ही संघांचे काही समर्थक प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून थेट मैदानावर दाखल होत होते. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असतानाच वाद मिटल्याने पुढील अनर्थ टळला. सामना संपल्यानंतर केएसए कार्यालयाबाहेर दोन्ही संघातील समर्थकांची गर्दी वाढु लागल्याने तणाव निर्माण झाला होता.
चार जणांना रेडकार्ड
सामना सुरू असताना गैरवर्तन केल्याबद्दल दोन्ही संघाच्या चौघांना रेडकार्ड देण्यात आले. यामध्ये झुंजार क्लबच्या सुर्यदीप सासणे, अवधुत पाटोळे तर बीजीएम स्पोर्टस्च्या अभिजीत साळोखे, महेश जामदार या खेळाडूंचा समावेश आहे.
Previous ArticleKolhapur Breaking: आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल
Next Article पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून रिक्षा जाळली









