कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात आज सकाळी आश्चर्यकारक घटना घडली आहे. आज सकाळी पश्चिम दिशेच्या बाजूला खुप उंचीवर पांढरीशुभ्र मोठी गोलाकार दिसणारी तबकडी सदृश्य वस्तू दिसून आली. अनेकांनी ही वस्तू परग्रहावरील लोकांची असल्याची चर्चा सुरू केली आहे. सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत अकाशात ही वस्तू दिसत होती. बहुतांश पन्हाळा नागरवासियांनी ही उडती वस्तू पाहिली. मात्र नेमकी ही वस्तू काय होती हे समोर आले नाही.
आज सकाळी आकाशात सुमारे तीन तास खुप उंचीवर पांढरी शुभ्र वस्तू दिसून आली. सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांच्या हा गोल लक्षात आला. यावेळी आकाशात दिसणारी वस्तू अत्यंत कमी वेगाने पुढे सरकत असल्याचे जाणवत होते. पन्हाळा येथील रमेश पाटील यांना या पांढऱ्या गोलाबाबत वेगळेपण जाणवल्याने त्यांनी शिवाजी विद्यापीठ अवकाश संशोधन केंद्रात संपर्क केला. पण तो अयशस्वी ठरला. पुढे त्यांनी त्याचे निरीक्षण केले, हा गोल उत्तर दिशेला सरकत गेला आणि मग पन्हाळ्यातून दिसेनासा झाला, असे रमेश पाटील यांनी सांगितले. रमेश पाटील यांनी आपल्या मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे.









