कोल्हापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसाचा जोर कायमच असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणातून कोणात्याही वेळी पाण्याचा विसर्ग सुरू होवू शकतो. त्यामुळे २०१९ व २०२१ साली ज्यांच्या घरात पूराचे पाणी आले होते त्या नागरिकांनी तातडीने शासकीय निवारागृहात किंवा आपल्या सोयीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सुचना देताना जिल्हाधिकारी कार्यालयातीही स्थलांतर प्रक्रिया सुरु आहे. मागील महापुरावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातही पाणी आले होते. गत पुरपरिस्थितीचा अनुभव पहाता यावेळीही महापूराची शक्यता असल्याने त्याच्या स्थलांतराचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजला तातडीने स्थलांतरीत करण्याचे आदेश दिले असून त्या संबंधित विभागांनी स्थलांतरण प्रक्रिया सुरु केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पूरबाधित सर्वच प्रशासकीय यंत्रणांना तातडीने आपली कार्यालये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्याचे आवाहन केले आहे