2019, 2021 च्या पुर परिस्थितील बचावकार्याचा अनुभव पाठीशी
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरवर येणाऱ्या प्रत्येक नैसर्गिक किंवा इतर संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनासोबतच स्थानिक स्वयंसेवी संघटनाही तितक्याच ताकदीने सज्ज असतात. महापूर, कोरोना काळात या संघटनांनी केलेली मदत आणि राबवलेले बचावकार्य उल्लेखनीय आहे. यंदाची संभाव्य पुरपरिस्थितीमध्ये तयार असल्याचे कोल्हापुरातील संघटनांनी सांगितले. पूरस्थिती उद्धवलीच तर येणाऱया संकटाचा सामना करण्यासाठी कोल्हापुरातील संस्थांनीही कंबर कसली आहे.
ऑरेंज आर्मी रेस्क्यू टीमही सज्ज
सेवाव्रत प्रतिष्ठानची ऑरेंज आर्मी रेस्क्यू टिम संभाव्य पुरस्थितीसाठी सज्ज झाली आहे. 2019 पासून हे पथक कार्यरत आहे. ऑरेंज आर्मीचे 49 मावळे पट्टीचे पोहणारे आहेत. त्यांना पुरामध्ये पोहण्याचा अनुभव आहे. 2019 व 2021 च्या पुरामध्ये शाहूपुरी, गवत मंडई, शुक्रवार पेठ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात त्यांनी बचावकार्य राबवले. या काळामध्ये 500 हून अधिक जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात ऑरेंज आर्मीने महत्वाची भूमिका बजावली. या टीमकडे 10 लाईफ जॅकेट, 1 बोट, ईन्नर, 5 दोरखंड, रुग्णवाहिका आहे. 2019 मध्ये टिमने धाडसाने तराफ्याने मदतकार्य राबवले होते.
अधिक वाचा- Kolhapur; पंचगंगेची मच्छिंद्री आता आठवणीपुरती..
संयुक्त जुना बुधवार रेस्क्यू टिम
संयुक्त जुना बुधवार पेठ येथील 20 तरुणांनी मिळून संयुक्त जुना बुधवार रेस्क्यू टिमची उभारणी केली. 2019 पासून पथक कार्यरत आहे. यामध्ये 20 तरुण प्रशिक्षित पोहणारे आहेत. पुर, आपत्ती काळात मदतकार्य राबवण्याचे नियोजन त्यांच्या पाठिशी आहे. महापुरात या पथकाने नागाळा पार्क, सिद्धार्थनगर, सुतार मळा परिसरात अग्निशमन दलासोबत बचावकार्य राबवले. 2019 मध्ये नागाळा पार्कमधील 700 हून अधिक जणांना रेस्क्यू केले. 2021 मध्ये याच परिसरातील पाचशेहून अधिक नागरीकाचे स्थलांतरण केले. पथकाकडे 1 जेट बोट, 20 लाईफ जॅकेट, 100 फुट दोर आहे. रंकाळा येथील काही बोटही मदतीला घेतल्या जातात.
प्रतिक्रिया
महापुरामध्ये ऑरेंज आर्मी रेस्क्यू टिमने प्रशासनासोबत बचावकार्य राबवले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी झेंडा उतरण्याच्या कर्तव्यावर होते. मात्र पुरात त्यांना जात येत नव्हते. यावेळी ऑरेंज आर्मीच्या जवानांनी तराफ्यावरुन जाऊन झेंडा उतरवला होता. 21 च्या महापुरामध्ये व्हिनस कॉर्नर येथील एका दवाखान्यातील 13 रुग्णांना पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी अन्यत्र स्थलांतरीत केले होते.
बंडा साळोखे, ऑरेंज आर्मी सदस्य
पुणे येथील पर्यटकाची ट्रॅव्हल्स 26 जानेवारी 2018 रोजी पंचगंगा नदीत कोसळल्यानंतर जुना बुधवार पेठेतील तरुणांनी बचावकार्यामध्ये प्रशासनास सहकार्य केले. त्यानंतर ही संकल्पना तरुणांमध्ये आली. 2019 व 2021 च्या महापुरामध्ये जुना बुधवार रेस्क्यु टिमने मदतकार्य राबवले.
कुणाल भोसले, जुना बुधवार रेस्क्यू टिम सदस्य
कोल्हापूरच रेस्क्यू टिम
कोल्हापूरवर आलेल्या प्रत्येक संकटामध्ये कोल्हापूरकर खंबीरपणे उभे राहतात. या काळात कोल्हापूरातील पेठा, तालीम संघटना, सामाजिक संस्था आपदग्रस्तांना मदतीचा हात देतात. प्रशासनासोबत मदतकार्य, बचावकार्य राबवून नागरीकांना आधार देतात. महापुरामध्ये याचा अनुभव आला आहे. कोरोना काळातही अनेक संघटनांनी गरजूंना मदतीचा हात दिला आहे.