जि.प.चे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांची माहिती : लघुउद्योगासाठी वित्तीय सहाय्य
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत लघु उद्योगासाठी शारिरीकदृष्टया दिव्यांग व्यक्तींना वित्तीय सहाय्य (बीज भांडवल) या योजनेअंतर्गत प्रोत्साहान देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना कार्यान्वीत आहे. जिह्यातील जास्तीत-जास्त पात्र अपंग, अव्यंग व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
बेरोजगार दिव्यांग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा उद्देश असून दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय, धंदा, उद्योग सुरु करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य बँकेमार्फत परतफेडीच्या कर्जाच्या स्वरुपात बीज भांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. अंध, अल्पदृष्टी, कर्णबधिर, अस्थीव्यंग व मतिमंद प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे.
योजनेच्या प्रमुख अटी
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. या बाबत डोमीसाईल सर्टिफिकेट आवश्यक. दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिकायाने दिलेले प्रमाणपत्र. (वैश्विक ओळखपत्र) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक. अर्जदाराचे वय वर्षे 18 ते 50 असावे. वयाचा दाखला आवश्यक (शाळा सोडल्याचा दाखला). अर्जाच्या नमुन्या नुसार इतर आवश्यक कागदपत्रे (अर्जासोबतची कागदपत्रांची सूची पहावी) योजनेअंतर्गत 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत प्रकल्प खर्चाची मर्यादा आहे. 20 टक्के एवढी रक्कम अनुदान स्वरुपात व उर्वरित रक्कम 80 टक्के रक्कम बँकेकडून कर्ज स्वरुपात मंजूर करण्यात येते. विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक व त्या सोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. योजनेची वर्गवारी-दिव्यांग व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे.
विवाह प्रोत्साहनासाठी अर्थिक सहाय्य योजना, 50 हजारांचे अर्थिक सहाय्य
जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत जिह्यातील दिव्यांग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहान देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना कार्यान्वीत आहे. किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास या योजनेअतंर्गत पात्र लाभार्थ्यास 50 हजार रुपये अर्थ सहाय्य दिले जाते. जिह्यातील जास्तीत-जास्त पात्र अपंग, अव्यंग व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
अर्थसहाय्य याप्रमाणे 25 हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र, 20 हजार रुपये रोख स्वरुपात, 4 हजार 500 रुपये संसार उपयोगी साहित्य / वस्तू खरेदी साठी व 500 रुपये स्वागत समारंभ कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे.
योजनेच्या अटी व शर्ती
वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिकायाने दिलेले प्रमाणपत्र असावे. (जिल्हा शल्यचिकित्सक यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र ) अपंग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विवाहित वधू व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत या पूर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा.विवाह झाल्यानंतर किमान एक वर्षाच्या आत या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधीत समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.