राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार-धनंजय महाडिक यांच्यात सामना : महाविकास आघाडी आणि भाजपची फिल्डिंग : अपक्ष आमदारांचे मत ठरणार निर्णायक
संजीव खाडे/कोल्हापूर
राज्यसभेच्या निवडणुकीत शुक्रवारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात कॉम्प्रमाईजचे प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे आता सर्वच सहा जागांसाठी निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. ज्या सहाव्या जागेवरून बिनविरोधचे घोडे अडले. तीच सहावी जागा आता चर्चेची ठरली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार आणि भाजप नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात सहाव्या जागेसाठी थेट सामना होत आहे. या निवडणुकीत अपक्ष आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. घोडेबाजाराची शक्यताही वर्तवली जात आहे. अशा स्थितीत सहाव्या जागेवर कुणाचाही विजय झाला तरी राज्यसभेची खासदारकी कोल्हापूरमध्येच येणार आहे, स्पष्ट आहे.
एरव्ही बिनविरोध होणारी राज्यसभेची यावेळची निवडणूक मात्र गाजत आहे. या निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा चर्चेचा आणि केंद्रस्थानी राहिला आहे. प्रारंभी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेकडे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवारी मागितली. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने अटी, शर्तीच्या राजकारणात संभाजीराजे यांचा पोलिटिकल गेम केला. संभाजीराजे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर संजय पवार यांना उमेदवारी देताना शिवसेनेने उमेदवार कोल्हापूरचा आणि मराठा असल्याची दक्षता घेतली. त्यातून संजय पवार यांना जॅकपॉट लागला. संभाजीराजे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शब्द मोडल्याच्या आरोपानंतर श्रीमंत शाहू छत्रपती यांनी संभाजीराजेंच्या विरोधात भूमिका घेताना ठाकरे यांची बाजू घेतली. त्यामुळे संभाजीराजेंना बॅकफूटवर जावे लागले. त्यांनाही या निमित्ताने राजकारणाचा अनुभव आला. दरम्यान, महाविकास आघाडीवर दबाब वाढविण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवार म्हणून उतरविले. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात कोल्हापूरचे दोन मल्ल राज्यसभेसाठी लढणार आहेत. या दोघांपैकी कुणीही जिंकला तरी राज्यसभेची खासदारकी कोल्हापूरलाच मिळणार आहे. 10 जूनला होणाऱया मतदानानंतर पवार आणि महाडिक यांच्यातील विजयी मल्ल ठरणार आहे.
महाविकास आघाडी, भाजपची फिल्डिंग
कट्टर शिवसैनिक म्हणून संजय पवार यांना थेट राज्यसभेची उमेदवारी देवून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेगळा मेसेज दिला आहे. आता पवार यांच्या विजयासाठी ठाकरे आणि त्यांच्या थिंक टँकला कष्ट घ्यावे लागणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई आदी मंडळी पवारांसाठी राबत आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांच्या आमदारांचे बळ आणि पाठिंबा दिलेल्या सहयोग आणि अपक्ष आमदारांचे बळ यांच्या जोरावर सहाव्या क्रमांकाचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास शिवसेना नेतृत्वाला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी अपक्ष आमदारांची बैठक घेऊन त्यांचे निधीचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली आहे. संजय पवार यांची उमेदवारी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे तर महाविकास आघाडीसाठी सत्तेच्या अस्तित्वाची आहे. कारण यात जर पाठिंबा असलेले आमदार फुटले तर त्याचा परिणाम नजीकच्या विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी होऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीकडून सावधानता बाळगली जात आहे.
भाजपने पेंद्रीय नेतृत्वाचा हवाला देत सहाव्या जागेसाठी उडी घेतली आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तयारी असेल तर किंवा जोडण्या झाल्या असतील तरच फडणवीस निवडणूक लढतात, असा आजवरचा अनुभव आहे. विधानपरिषदेच्या बिनविरोध जागांचा प्रस्ताव देत राज्यसभेची सहावी जागा पदरात पाडण्याचा त्यांचा प्रयत्न, प्रस्ताव शिवसेनेने धुडकावल्यानंतर आता फडणवीस कोणती मुव्ह करणार, धनंजय महाडिक यांना उर्वरीत मते कुठून आणणार?, महाविकास आघाडीतील अपक्षांना कसे फोडणार? याकडे साऱयांच्या नजरा आहे. काँग्रेसने इम्रान प्रतापगढी या उत्तर प्रदेशात पावणेसहा लाख मतांनी पराभूत झालेल्या नेत्याला उमेदवारी दिल्याने काँग्रेस आमदारांत नाराजी आहे, त्याचा लाभ उठविण्याचा भाजप नेतृत्व प्रयत्न करेल. आमदारांच्या मतासाठी घोडेबाजार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. एक एक मत महत्वाचे असल्याने साम, दाम, दंड आणि भेद ही नीती दोन्हीकडून वापरली जाऊ शकते. त्यात कोण यशस्वी होतो, यावर राज्यसभेचे निकाल लागणार आहेत.
अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या आमदारांवर मदार
विधानसभेत 29 अपक्ष आमदार आहेत. त्यात बहुजन विकास आघाडीचे 3, समाजवादी पार्टीचे 2, एमआयएमचे 2, प्रहार जनशक्तीचे 2, मनसे, माकप, शेकाप, स्वाभिमानी, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतीकारी शेतकरी पक्ष यांचे प्रत्येकी 1 या लहान पक्षांच्या आमदारांचाही समावेश आहे. त्यामुळे अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचे आमदार निर्णायक ठरणार आहेत.
व्हीप लागू होत नसल्याने अपक्षांना भाव
पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या आमदारांना व्हीप लागू होतो. तसेच त्याला दिलेले मत आपल्या पक्ष प्रतोदाला दाखवावे लागते. मात्र अपक्ष असो वा छोटे पक्षवाले असोत, त्यांना पक्ष प्रतोदाला न दाखविता मतदान करता येणार आहे. त्यामुळे त्यांनी कुणाला मत दिले हे कळणार नाही. अशा स्थितीत अपक्षांना फोडता येऊ शकते, याची जाणीव सत्ताधारी व विरोधकांना आहे. सद्सद् विवेकबुद्धीची कुणीही कितीही भाषा केली तरीही अपक्षांच्या मतासाठी घोडेबाजार होऊ शकतो.