तरूण भारत प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत ‘माती वाचवा’ या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी इथोनॉल वापराबाबत भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले की, भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 2014 च्या तुलनेत 5 पटींनी वाढले आहे. पूर्वी ते 2 टक्के होते ते आता 10 टक्क्यापर्यंत वाढले आहे. भारताने हा टप्पा नोव्हेंबर 2022 च्या नियोजित लक्ष्याच्या पाच महिने अगोदरच गाठला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉलबाबत बोलताना सकारात्मकता दर्शवली आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर चिंता व्यक्त करताना भारतात जिवाश्म इंधनाला पर्याय शोधणे अनिवार्य आहे असे सांगताना देशात लवकरच इथेनॉलयुक्त इंधनावर चालणारी वाहने धावायला लागतील असे संकेत दिले.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही सांगितले आहे की, एप्रिल 2023 अगोदरच देशातील निवडक पेट्रोल पंपांवर 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध होईल.
इथेनॉल मिश्रणाची जागतिक परिस्थिती
युनायटेड स्टेट्स, ब्राझील आणि युरोपच्या काही भागांसारखे देश इथेनॉलचे उच्च मिश्रण असलेले पेट्रोल वापरतात. काही देशात E100 म्हणजे 100 टक्के मिश्रण वापरले जाते. भारत सरकारने अलीकडेच E10 म्हणजेच 10 टक्के इथेनॉलला परवानगी दिली आहे. ती E20 पर्यंत म्हणजे 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
इथेनॉल मिश्रण म्हणजे काय?
इथेनॉल एक सेंद्रिय संयुग असून ते इथाइल अल्कोहोल म्हणून ओळखले जाते. ते बायोमासपासून बनवलेले इंधन आहे. दारूसारख्या अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये याचा वापर केला जातो. त्यात गॅसोलीनपेक्षा जास्त ऑक्टेन नंबर म्हणजे ज्वलनशील घटक आहेत, त्यामुळे पेट्रोलचा ही ऑक्टेन नंबर सुधारतो.
वाहनांच्या इंधनासाठी तांत्रिकदृष्ट्या इथेनॉल पूर्णपणे वापरता येत नसले तरी त्यासाठी इंजिन आणि वाहनांच्या काही भागांमध्ये बदल करावे लागतील. मात्र सध्या पेट्रोलमध्ये ते मिसळून त्याचा प्रभावी वापर करता येतो. इथेनॉल मिश्रित पेट्रोल देशात आधीच वापरात आहे.
इथेनॉल हे जैवइंधन असून ते उसाच्या मोलॅसिस पासून मिळवले जाते. इथेनॉलमध्ये पाण्याचे प्रमाण नसल्यामुळे तसेच ते ऑक्सिजनने समृद्ध असल्याने अत्यंत ज्वलनशील बनते. इथेनॉलची ज्वलनक्षमता वाढल्याने वाहनांचे इंधनाची कार्यक्षमता वाढून कोणत्याही घटकाचे उत्सर्जन मागे टाकत नाही त्यामुळे प्रदूषण होत नाही.
इथेनॉल मिश्रणाचे फायदे
इथेनॉल हे जैविक पदार्थापासून तयार होत असल्याने तो उर्जेचा एक अक्षय स्रोत ठरत आहे.
इथेनॉल मिश्रित पेट्रोल गॅसोलीनला चांगला आणि स्वस्त पर्याय म्हणून तयार होत आहे. तसेच पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल खुपच स्वस्त आहे.
इथेनॉलमध्ये ज्वलनशील घटक जास्त असल्याने त्याचा ऑक्टेन नंबर पेट्रोलच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोलची ज्वलशीलता वाढते तसेच इंजिन आवाज करत नाही त्यामुळे ध्वनिप्रदुषण होत नाही.
इथेनॉलच्या ज्वलनाने कोणतेही अवषेश कींवा घटक बाहेर पडत नाही. त्यामुळे वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. इथेनॉलच्या ज्वलनामुळे अत्यंत कमी कार्बन मोनो ऑक्साईड (CO) आणि सल्फरडाय ऑक्साइड SOx तयार होतो. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साइड मुळे होणारे पर्यावरणाची हानी कमी होते.
इथेनॉल मिश्रणाचे तोटे
इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे मायलेज कमी असते असते.
इथेनॉलमुळे वस्तूंना गंज लवकर चढतो. त्यामुळे, इथेनॉलच्या अतिवापरामुळे वाहनाचे आणि पर्यायाने इंजिनचे भाग खराब होऊ शकतात.
इथेनॉल पाण्याकडे खुप आकर्षिला जातो. त्यामुळे ‘फेज सेपरेशन’ होते. म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोल पाण्याच्या संपर्कात आल्यास इथेनॉलचा संपूर्ण भाग पेट्रोलपासून वेगळा होतो. त्यामुळे पाणी आणि पेट्रोलचे दोन वेगळे थर तयार होतात. इथेनॉलच्या या गुणधर्मामुळे इंजिन लवकर खराब होऊ शकते.