खासदार संजय मंडलिक यांची माहिती; युद्धपातळीवर काम होणार पुर्ण; कामगारांच्या सोईसाठी उपप्रादेशिक कार्यालयाचीही सोय
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर येथील ई.एस.आय.सी. हॅस्पीटलच्या आधुनिकीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरु होणार असून लवकरच पुर्ण होणार असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली. कामगारांच्या सोयीसाठी उपप्रादेशिक कार्यालयाचीही सोय करणार असल्याचे मंडलिक यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
पत्रकात खासदार मंडलिक यांनी म्हटले आहे, माझ्या अथक प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या ई.एस.आय.सी. हॉस्पीटलच्या आधुनिकीकरण प्रकल्पाचे काम केंद्रीय लोक निर्माण विभागाने मार्च 2021 मध्ये टेंडर प्रक्रीया राबवून दिल्ली येथील ठेकेदारास डिसेंबर 2022 अखेर पुर्ण करण्याच्या अटीवर दिले होते. पण वेळोवेळी सुचना देवून ही सदर ठेकेदाराकडून काम वेळेत पुर्ण होण्याची शक्यता नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचा ठेका रद्द करुन काळ्या त्या ठेकेदाराचा यादीत समावेश केला. या विषयाबाबत माझ्या विनंती पत्राची तातडीने दखल घेवून केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सदर कामाची जलद गतीने नव्याने निविदा प्रक्रीया राबवून सक्षम ठेकेदाराची नेमणूक केली आहे.
सदरचा प्रकल्प अल्पावधीत पुर्ण होण्यासाठी माझ्या पुढाकाराने 2 ऑगस्टला दिल्ली येथे ई.एस.आय.सी. च्या राष्ट्रीय मुख्यालयात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पाडली. यावेळी हॉस्पीटलच्या कामाचा आढावा घेवून नवीन ठेकेदारांकडून विहीत कालावधीत मार्च 2023 पर्यंत युध्द पातळीवर काम पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. लाखो कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘एम्स’च्या धरतीवर एकाच छताखाली सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा या प्रकल्पामुळे उपलब्ध होणार असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगीतले. कोरोनामुळे ई.एस.आय.सी. योजनेबद्दल कोल्हापूर विभागात जागरुकता व वाढता लोकसहभाग पाहता सध्या असलेली दीड लाख ही लाभार्थ्यांची संख्या लवकरच दुप्पट होण्याची शक्यता आहे. सदर योजनेमध्ये सहभागी असलेल्या श्रमिकांच्या कुटुंबियांची संख्या देखील जवळपास दहा लाखाने वाढणार असल्याने कोल्हापूरातच ई.एस.आय.सी.चे उप प्रादेशिक कार्यालय होणे ही काळाची गरज आहे. त्यानुसार याबाबत कार्यवाहीचा प्रस्ताव सादर केला असल्याचे खासदार मंडलिक यांनी स्पष्ट केले.
उद्योग व व्यापार क्षेत्राचे प्रतिनिधी व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञान मुंडे यानी प्रादेशिक कार्यालयाच्या कोल्हापूरातील स्थापनेमुळे कामगार व आस्थापनाचे विविध आर्थिक व प्रशासकीय बाबींचे काम जलद निर्गतीकरण होण्यास मदत होईल असे सांगीतले. या बैठकीत महाराष्ट्र राज्यामध्ये ई.एस.आय.सी. च्या पायाभूत वैद्यकीय सुविधांचे जाळे वाढविण्यासाठी सखोल चर्चा होवून त्याबाबत राज्य शासनाच्या समन्वयाने एक ‘रोड मॅप’ तयार करण्याचे ठरले. तसेच महाराष्ट्रातील प्रलंबित वैद्यकीय विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याबाबत झालेल्या चर्चेमध्ये योग्य उपाय योजना करणार असल्याचे ई.एस. आय.सी.चे डायरेक्टर जनरल मुखमित सिंग भाटीया यांनी सांगितले. बैठकीस श्रम मंत्रालय व नगर विकास विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित असल्याचे पत्रकात नमूद आहे.