एकोंडीतील सखुबाई पाटोळे यांनी स्वतःपासून केली सुरुवात : महिलांचे आत्मबल वाढविणारा निर्णय
प्रतिनिधी/कोल्हापूर
दुर्दैवाने पतीच्या निधनानंतर पत्नीला विधवा प्रथेमुळे अपमानित जीवन जगावे लागत होते. या अनिष्ट प्रथेला मुठमाती देत एकोंडी (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीने ही प्रथा बंद करून महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचा निर्णय घेतला. या निर्णया दिवशीच खासदार संजय मंडलिक यांचे स्वीयसहाय्यक अमर पाटोळे व माजी उपसरपंच सुधीर पाटोळे यांच्या मातोश्री सखुबाई पाटोळे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करून महिलांचे आत्मबल वाढविले.
लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे बालपणापासूनचे मित्र श्रीपती पाटोळे यांचे 90 व्या वर्षी निधन झाले. नेते मंडलिक यांच्या प्रमाणेच पाटोळे यांनीही अखेरपर्यंत पुरोगामी विचारांची कास धरली. त्यांच्या निधनानंतर पत्नी सखुबाई यांनीही त्यांच्या विचारांचा अंगीकार करत अनिष्ट प्रथेला मुठमाती देण्यासाठी पुढाकार घेवून त्याची सुरुवात स्वतःपासून केली. यावेळी पोलीस पाटील संजय बल्लाळ, नागनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी चौगुले, लता चौगुले तसेच, दिलीप पाटोळे, पांडूरंग पाटोळे, चंद्रकांत पाटोळे, बाळासाहेब पाटोळे आदी नातेवाईकांनीही सखुबाई यांचे मत परिवर्तन केले.
सरपंच पुनम प्रकाश सूळगावे, उपसरपंच अक्षय चौगुले, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसूर्लेकर यांनी पाटोळे कुटूंबीयाच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी देवानंद पाटील (निढोरी), इगल प्रभावळकर (कागल), बाळासाहेब माने, राजू फासके, माजी सरपंच शामराव सुदर्शनी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
विधवा प्रथेविरोधातील चवळवळ महिलांना बळ देईल
’कोणतीही चुक नसतानाही विधवा महिलांना अपमानित जीवन जगावे लागत. गावागावात विधवा प्रथेविरोधी उभारत असणारी चळवळ महिलांना निश्चितच बळ देईल.
– सखूबाई पाटोळे, एकोंडी