यशवंत लांडगे कोल्हापूर
यंदा आम्ही साऊंड सिस्टीम दणक्यात लावणार. दोन वर्षांनी उत्सव होतोय, आता बंधने नकोत. कार्यकर्त्यांनो आपला आवाज सगळय़ात जास्त घुमला पाहिजे, आता थांबायचं नाही, कोण अडवतोय बघतोच, अशा अविर्भावात तरुणांना चेतावणी देणारे नेते, युवा नेते नेमक्यावेळी घरी जाऊन झोपतात. नॉटरिचेबल होतात आणि निस्तरायला लागतं ते कार्यकर्त्यांना, करिअरच्या उंबरठय़ावर असलेल्या तरुणांना… गणेशोत्सव आणि मिरवणुकांच्या निमित्ताने ग्रामीण भागातही आता प्रबोधनाची गरज आहे. कारण येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे पुढारी आता चांगलेच सक्रीय झाले आहेत.
कोरोना आणि महापुराचा फटका बसल्याने गेल्या तीन वर्षात विविध उत्सवांच्या उत्साहावर पाणी फिरले. कोरोनाच्या कडक निर्बंधात तर उत्सवच झाले नाहीत. यंदा कोरोनातून सुटका झाली नसली तरी काहीसा दिलासा मिळाल्याने बऱयापैकी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यातील सगळय़ात महत्वाचे म्हणजे उत्सव व मिरवणुकांवरील बंधने कमी झाल्याने तरूणाईचा उत्साह दुणावला आहे. यंदाचा गणेशोत्सव दणक्यातच करायचा हे आता सर्वांनीच ठरवले आहे. त्यासाठी जय्यत तयारीही सुरू झाली आहे. साऊंड सिस्टीमचा दर्जा पाहून अनेक मंडळांनी बुकींगही केले आहे. एकीकडे मंडळांनी जय्यत तयारी केली असतानाच दुसरीकडे पोलीस प्रशासन गावगावांत बैठका घेऊन शिस्तबद्ध उत्सवाचे आवाहन करत आहेत.
यंदा जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अनेक गावांत ग्रामपंचायतींच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या सर्वांचे टार्गेट आहे ते तरुणाई. तरुणाईला खूष करण्यासाठी नेते, युवा नेते व इच्छुक आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत. गणेशोत्सव हा या नेत्यांना पर्वणीच ठरत आहे. आपल्या गटाचे, पक्षाचे किंवा उमेदवारीचे ब्रँडिंग करण्यासाठी गणेशोत्सवासारखी चांगली संधी नाही, हे ओळखलेल्या पुढाऱयांनी मंडळांना मदत करणे, रात्री उशिरापर्यंत मंडळांच्या कट्टय़ांवर कार्यकर्त्यांत बसणे याचा सपाटा लावला आहेच, पण सर्वात महत्वाचे म्हणजे तरुणाईचा विकपॉईंट असणाऱया मिरवणुका आणि साऊंड सिस्टीमवर लक्ष केंद्रीत केले आहे.
यंदा साऊंड सिस्टीम दणक्यात लावायची. दोन वर्षांनी उत्सव करतोय, आता बंधने नकोत. आपला आवाज सगळय़ात जास्त घुमला पाहिजे, आता थांबायचं नाही, कोण अडवतोय ते बघतोच, मी आहे तुमच्या पाठीशी, असे सांगून तरुणांना खूष करण्याचा प्रयत्न करणारे नेते, युवा नेते आता गावोगावी-गल्लोगल्ली तयार झाले आहेत. साहेब आहेत म्हटल्यावर तरुणांचाही उत्साह वाढतच आहे. अनेक मंडळांनी या पुढाऱयांच्या जीवावरच लाखो रुपयांची साऊंड सिस्टीम बुक केली आहे. एवढय़ावरच न थांबता हे पुढारी मंडळाच्या बैठकांतही तावातावाने बोलत आहेत. साहेब दोन वर्षांनी उत्सव होतोय, यंदा दुर्लक्ष करा, अन्यथा आम्ही कुणाचे ऐकणार नाही, असे मंडळ आणि पोलिसांच्या बैठकांत सांगतात. त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्यावर खूश होतात. पर्यायाने कार्यकर्त्यांत आपली नेतेगिरीची इमेज बनविण्यात ते यशस्वी होत आहेत. पण खरच त्यांना उत्सव, मंडळ किंवा तरुणांची काळजी आहे का, की येणाऱया निवडणुकांसाठी हे चाललंय, हे तपासण्याची गरज आहे.
आपण उत्साहाच्या भरात असतो. त्यामुळे आपण कळत न कळत कायदा मोडतो. पोलीस मिरवणुका थांबवतात. वाद होतात. आपण त्या पुढाऱयांना फोन करतो कारण ते मिरवणुकीत नसतात. नेमक्यावेळी ते घरी जाऊन झोपलेले असतात. काहीजण तर नॉटरिचेबल होतात. मग गुन्हे दाखल होतात. आणि निस्तरायला लागतं ते कार्यकर्त्यांना, करिअरच्या उंबरठय़ावर असलेल्या तरूणांना. अगदी कोण पुढारी आलाच तर यंत्रणा ऐकेल याची गॅरंटी नसते. त्यामुळे कार्यकर्ते अडकतात..
तुम्हीच ठरवा कायद्याचं ऐकायचं की पुढाऱ्यांचं
विविध कार्यक्रमांच्या आणि मिरवणुकांच्या निमित्ताने जिल्हय़ात सुमारे 1100 कार्यकर्त्यांवर नियमभंगांसह विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील अनेक तरुणांचं करीअर धोक्यात आलं आहे. काही क्षणाची मजा त्यांच्यासाठी आयुष्याची सजा बनते. उत्सव हवेतच पण ते नियमांत. पोलीस प्रशासनही नियम सांगते, इशारा देते, पण आपण कायद्याचं न ऐकता पुढाऱ्यांचं ऐकतो आणि फसतो. मग सुरु होतात कोर्टाच्या चकरा आणि आर्थिक भुर्दंड वर्षानुवर्षे. शारीरिक आणि मानसिक त्रास होतो तो वेगळाच. पालकांनी यात गांभिर्यांने लक्ष घालण्याची गरज आहेच, शिवाय तरुणांनीही मंडळाच्या कमिटीत पुढारी किंवा त्यांच्या मुलांचा समावेश करावा, जेणेकरून गुन्हे दाखल झाल्यास पुढाऱ्यांनाही झळ बसेल..









