सदाशिव आंबोशे, सेनापती कापशी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अध्ययन संपादनूक सर्वेक्षण 2023 मध्ये कोल्हापूर जिह्याने राज्यात सरासरीने अव्वल क्रमांक मिळवला आहे. निश्चितच कोल्हापूर जिह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही बाब अभिमानास्पद आहे.आज 15 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे शिक्षण सचिव रणजीतसिंह देवल, महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त सुरज पांढरे, एस.सी. ई. आर. टी. चे संचालक अमोल एडगे, एसएससी बोर्ड महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद गोसावी, संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सूर्यवंशी,सहसंचालक रमाकांत काठमोरे शिक्षण उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांच्या उपस्थितीत माहिती देण्यात आली.
24 मार्च 2023 रोजी तिसरी, पाचवी,आठवीसाठी एकाच दिवशी संपूर्ण राज्यात हे सर्वेक्षण घेण्यात आले होते.सदर सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची अध्ययन संपादनुक पातळी तपासणे हा होता.हे सर्वेक्षण नमुना सर्वेक्षण असून महाराष्ट्रातील तिसरी, पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. प्राप्त माहितीचे जिल्हा निहाय अध्ययन, निष्पत्ती निहाय, क्षेत्रनिहाय, लिंगनिहाय, सामाजिक संवर्गनिहाय, शाळा व्यवस्थापन आदीनुसार विद्यार्थ्यांच्या संपादनुकीचे विश्लेषण करण्यात आले आहे. सदर अहवालाच्या आधारे विद्यार्थ्यांचे अध्ययन संपादनुकीची स्थिती समजणार आहे.या अहवालाचे निष्कर्ष व शिफारशींच्या आधारे पुढील शैक्षणिक नियोजन करण्यात मदत होणार आहे.इयत्ता तिसरी भाषा मराठी विषयांमध्ये कोल्हापूर जिह्याची संपादूनक 84.73 टक्के इतकी आहे. तर गणित या विषयांमध्ये संपादनूक 78.78 टक्के इतकी आहे. तिसरी भाषेमध्ये कोल्हापूर जिह्याचा राज्यात द्वितीय तर गणितामध्ये राज्यात प्रथम क्रमांक आहे.राज्याची भाषेची सरासरी संपादनुक77 टक्के आहे.
गणिताची सरासरी संपादूनक 68.5 टक्के आहे. इयत्ता पाचवी भाषा विषयाची जिह्याची संपादूनक 68.48 टक्के आहे.तर गणित विषयाची संपादनूक 73.56 टक्के इतकी आहे.राज्याची भाषेची सरासरी संपादनूक 65 .50 टक्के आहे.तर गणित विषयाची सरासरी संपादणूक 64.50 टक्के आहे. पाचवीच्या भाषेच्या संपादनुक मध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात द्वितीय तर गणित विषयांमध्ये राज्यात प्रथम आहे.इयत्ता आठवी भाषा विषयाची जिह्याची संपादणूक 75.58 टक्के आहे. गणित विषयाची जिह्याची संपादनूक 52.53 टक्के आहे.
राज्याची मराठी विषयाची सरासरी संपादनूक 69.52 टक्के आहे. गणित विषयाची सरासरी 49.10 टक्के आहे.भाषेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात द्वितीय तर गणितामध्ये राज्यात नव्या स्थानावर आहे.एकूण सरासरी संपादनुकमध्ये कोल्हापूर जिल्हा 72.10 टक्के सरासरीसह राज्यात प्रथम असून 71.9 टक्के इतक्या सरासरीने सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे.
नॅशनल अचीवमेंट सर्व्हे (नास) च्या तयारीसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने दिशा प्रश्न पेढी तयार केली होती.त्याचा सराव शिक्षक आणि शाळेमध्ये घेतला होता. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी जिह्यामध्ये केली होती.याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) व प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त प्रयत्नांनी गुणवत्ता विकासाचे कार्यक्रम राबविण्यात आले. त्यामुळेच कोल्हापूर जिह्याला राज्यात प्रथम क्रमांकाचे यश मिळाले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने या सर्वेचे जिल्हास्तरीय नियोजन अंमलबजावणी व नियंत्रण केले होते.या संपूर्ण कार्यक्रमासाठी तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची प्रेरणा मिळाली होती.तर डायटचे प्राचार्य डॉ.आय.सी.शेख,तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती आशा उबाळे,शिक्षणाधिकारी माध्यमिक एकनाथ आंबेकर यांनी कृती कार्यक्रम राबवण्यात पुढाकार घेतला होता.
या यशानंतर डायटचे प्राचार्य डॉ.आय.सी.शेख यांनी जिह्यातील सर्व उपशिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी,प्रशासन अधिकारी,विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख यांचे अभिनंदन केले.जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षक यांनी केलेल्या कष्टामुळेच यश प्राप्त झाले असून जिह्यातील सहभागी शाळातील विद्यार्थी शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले. आता एसएलएएस अहवालामध्ये जिह्याचे विश्लेषण करून पुढील कार्यक्रमाचे नियोजन विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर संतोष पाटील तसेच शिक्षण उपसंचालक कोल्हापूर महेश चोथे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असून नास 2024 मध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार आहे.









