भीक नको पण कुत्रे आवर असे पडताळणीचे दिव्य
कोल्हापूर : संतोष पाटील
जालना जिह्यात मराठा समाजाच्या आंदोलनानंतर कुणबी मराठा दाखल्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोल्हापूर जिह्यात कुणबी दाखला पूर्वीपासूनच मिळतो. कोल्हापूर जिह्यात 1967 पूर्वीच्या रक्ताच्या नातेवाईकांच्या दाखल्यावर कुणबी किंवा कु अशा सर्वाधिक नोंदी शाहूवाडी अन् पन्हाळा तालुक्यातच आढळतात. उर्वरित तालुक्यात हे प्रमाण अत्यल्प आहे. शेकडो प्रकारची कागदपत्रे मिळवून महसूलच्या लालफितीतून दाखला मिळवलाच तरी कुणबी दाखल्याची पडताळणी करताना संबंधित विभागाकडून दुजाभाव होतो. परिणामी कुणबीची पडताळणी म्हणजे भीक नको पण कुत्रं आवर अशीच मराठा समाजबांधवांची अवस्था आहे. कुणीबी दाखला मिळवणे आणि त्याची पडताळणी अधिक सुटसुटीत करण्याची नितांत गरज आहे.

आंदोलनानंतर विदर्भ मराठवाड्यासह अनेक जिह्यात आता कुणबी दाखला देण्यात येईल. मात्र हा दाखला पूर्वीपासून कोल्हापुरात दिला जातो. कोल्हापूर जिह्यात दोन तालुक्यात कुणबीच्या नोंदी अधिक असल्या तरी सर्व तालुक्यात जिथे नोंदी असतील त्यांना कुणबीचा दाखला दिला जातो. पण त्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या रक्ताच्या नात्यातील कुठल्याही एका नातेवाइकांचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा सादर करावा लागत आहे. यासह शेकडो प्रकारची कागदपत्रे जमा करताना संबंधिताला नाकीनऊ येते. विशेषत: शैक्षणिक तसेच स्पर्धा परिक्षेसाठीच या दाखल्याचे महत्त्व अधिक असले तरी निवडणुकीत खुल्या तसेच ओबीसी गटातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण कुणबी दाखल्याचा मागील दरवाजातून उपयोग करत असल्याचे उदाहरणे आहेत.
निवडणुकीसाठी दाखला देणारी एक यंत्रणाच महसूलमध्ये कार्यरत आहे. यासाठी काही लाखांचे मोल मोजावे लागते. अशा पध्दतीने मिळवलेला दाखला पडताळणी झाला तरी पुढे न्यायालयात टिकत नाही. यातून अनेकांना निवडून आल्यानंतर ही पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे. मात्र, निकाला लांबत ठेवून पाच वर्षे पदावर राहिलेल्यांची संख्याही मोठी आहे. निवडणुकींच्या खेळामुळेच कुणबी दाखला बदनाम झाला आहे. राजकारण्यांनी राजकीय पदाच्या आशेनं कुणबी दाखल्याचे महत्व वाढवून ठेवले. याची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागते. यंत्रणा एकाच चाळणीतून कुणबी दाखल्याकडे पहाते. कुणबी दाखला मिळवून देणारी एजंटांची साखळीच महसूल विभागात कार्यरत आहे. तलाठी कार्यालयापासून तहसील आणि प्रांत कार्यालयापर्यंतेच दरपत्रक ठरलेले आहे. यानंतर जातपडताळणी विभागात कुणबीच्या दाखल्यांचा खच पडला आहे. इतर जातीच्या दाखल्यांची पडताळणी सहज होते. मात्र कुणबीच्या दाखला विशेष ओळख अथवा वजन ठेवल्याशिवाय पडताळणी होऊच शकत नसल्याचे अनेकांचा अनुभव आहे. जालन्यातील आंदोलनानंतर कुणबी दाखल्याबाबत नवीन नियमावली बनवताना दाखला मिळवणे तसेच पडताळणीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि पारदर्शी करण्याची गरज आहे.
कुणबीचा आधार काय ?
कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक (तुमचे वडील/ चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्यापणजोबांचे चुलते/आत्याखापर पणजोबांचे चुलते/आत्या आदी. यापैकी कुठल्याही एका नातेवाइकांचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. हा पुरावा मिळविणे सोपे नाही. त्यासाठी शासनाने निर्णय घेताना सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काहीतरी उपाय योजना करणे आवश्यक आहे. याबाबतचे त्या त्या तालुक्यात असलेल्या जुन्या नोंदी असलेली कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठा समन्वयकांनी शासनाकडे तशी मागणी करून त्याची अंमलबजावणी करून घेणे गरजेचे आहे.
कुणबी आहात काय कसे तपासायचे ?
रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं14 मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. 1 डिसेंबर 1963 पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनाते संबंधातील नातेवाइकांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं 14 किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासावे. आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी (6 नोंदी) जमीन वाटप नोंदी, 7/12 उतारे 8 अ उतारे फेरफारखरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड.ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक हवकपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे. रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा. रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल.









