संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक होत आहेत. याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही पाहायला मिळत आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी कँडल मार्च, गाव बंद, उपोषण तसेच राजकीय नेत्यांना अडवून आंदोलन सुरु आहे. याचा आढावा पुढीलप्रमाणे
सांगरूळ येथे लोकप्रतिनिधींना गावबंदी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सांगरूळ येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लोकप्रतिनिधीना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी एकत्र येत कॅन्डल मार्च लाक्षणिक उपोषण व यानंतर आता लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे – लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश करण्यास मनाई करणारा फलक गाववेशीवर लावला आहे. यावेळी संभाजी नाळे, जनार्दन खाडे, भगवान लोंढे, एन. जी. खाडे, सुनील कापडे, महादेव खाडे, रोहित नाळे, प्रशांत नाळे, सागर खाडे, अशोक कांबळे, मच्छिंद्र कांबळे यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मजरे कार्वे ग्रामस्थांचा नेत्यांना इशारा….जरांगे पाटलांना पाठिंबा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास मजरे कार्वे ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला. गावात लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्या मंडळी पर्यंत सर्वांनीच कॅण्डल मोर्चा काढून या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. या मोर्चात महिलांची व लहान मुलांची संख्या लक्षणीय होती. गावातील धर्मवीर संभाजी चौकापासून या मोर्चास सुरुवात करून ग्रामपंचायत कार्यालया जवळ मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चात प्रचंड घोषणाबाजी करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न या करण्यात आला. चंदगड तालुक्यातीलच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना या मोर्चातून इशारा देण्यात आला. मोर्चाची सांगता समारंभावेळी सकल मराठा संघाचे समन्वयक प्रा. दीपक पाटील यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी कार्वे चे सरपंच शिवाजी तुपारे, उपसरपंच पांडुरंग बेनके, तानाजी गडकरी, नारायण तेजम, प्रा. राजू घोरपडे, यल्लुप्पा वेसणे, एस आर पाटील, अशोक बोकडे यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटणे फाट्यावर रास्ता रोको
मराठा आंदोलनाची तीव्रता महाराष्ट्रात वाढत असताना आज पाटणे फाटा (कार्वे) येथे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. प्रारंभी बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. रास्ता रोकोमुळे बेळगाव- वेंगुर्ला या प्रमुख मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहानांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. वाहनधारकांची व प्रवाशांची कुचंबणा होऊ नये म्हणून आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन थांबवुन साखळी उपोषणाला सुरुवात केली. यावेळी जि प च्या माजी सभापती ज्योतिताई पाटील म्हणाल्या, हा लढा मराठयांच्या अस्तितवाचा लढा आहे, आता नाही तर कधीही नाही याचे भान प्रत्येक मराठी माणसाने ठेवायला हवे. कुणीही मागे हटून चालणार नाही. असे सांगून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. विष्णू गावडे यांनी तरुणांनो तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे असे.मराठ्यावरील अन्याय आता सहन केला जाणार नाही असा इशारा दिला.
आमशी येथे ग्रामस्थांकडून साखळी उपोषण
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आमशी (ता. करवीर) येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला. तसेच ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. आमशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली . संपूर्ण गावांमध्ये फिरून आरक्षणासाठी जनजागृती करण्यात आली.या यावेळी शालेय मुले, तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच आरती सावंत, उपसरपंच बाजीराव कांबळे, प्रकाश पाटील, कृष्णात पाटील, शिवाजी पाटील, जयदीप पाटील,सरदार कांबळे, दिनकर पाटील, सरदार सावंत, योगेश बचाटे, बाजीराव पाटील, लक्ष्मण पाटील आदींसह ग्रामस्थांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

खोची येथे मराठा आरक्षणसाठी कॅन्डल मार्च
मराठा आरक्षण मिळावे यासाठी खोची ता.हातकणंगले येथे सोमवारी सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून कॅडल मार्च काढण्यात आला.यावेळी पाचशेहून अधिक ग्रामस्थांनी व विशेषतः मुलींनी सहभाग घेतला होता.तसेच जोपर्यंत मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळत नाही.तोपर्यंत कोणताही राजकीय कार्यक्रमाचे आयोजन न करणे तसेच राजकीय नेत्यांना गावबंदीचा ठराव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला.अशी माहिती माजी सरपंच जगदीश पाटील यांनी दिली.कॅन्डल मार्च नंतर हनुमान मंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत पेठवडगाव येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उद्या मंगळवारी सर्व ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

सावर्डे दुमाला येथे मशाल मोर्चा काढून जरांगेंना पाठिंबा
मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा संघ हजारोंच्या संख्येने एकत्रित येत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या हेतूने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाच्या धगीस सुरूवात झाली आहे. आज करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला या गावी मशाल मोर्चा काढून ग्रामपंचायत चौकातून जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी प्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मशाल पेटवण्यात आली.या आंदोलनामध्ये मराठा समाजातील पुरुषांबरोबर महिलां सुद्धा आघाडीवर होत्या.राम मंदिरापासून आंदोलनं सुरू करून भावे श्वरी मंदिर ते विठ्ठल मंदिरा पर्यत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये एक मराठा .. लाख मराठा..आरक्षण आमच्या हक्काचे .. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत अबाल वृद्धापासून ज्येष्ठ नागरिकांचा प्रामुख्याने समावेश होता.

नेत्यांना गावात प्रवेश नाही, राधानगरीतील पडळी व कारीवडे ग्रामस्थांचा निर्णय
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात जिल्ह्या पेटून उठला आहे. दरम्यान राधानगरी तालुक्यातील पडळी व कारीवडे (ता.राधानगरी) येथील ग्रामपंचायत, सकल मराठा समाज व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आरक्षणासाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच आगामी सर्व निवडणुकांतील मतदानांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला आहे याबाबत आज फलक लावून या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आंदोलन पुकारले आहे.’ ‘ग्रामपंचायत व सर्व समाजाच्या वतीने, सर्व तरुण मंडळे, सर्व संस्था, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश मिळणार नाही. असा निर्णय घेतला आहे.असे सरपंच प्रविण पाटील म्हणाले आहेत.
सावरवाडी येथे सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी
सध्या महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाचा विषय रौद्र रूप घेत आहे. आज पर्यंत मराठा आरक्षणसाठी ४९ मराठा बांधवानी बलिदान दिले आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जोपर्यँत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना करवीर तालुक्यातील सावरवाडी या गावात प्रवेशबंदी करण्यात आली. यासाठी सावरवाडी गावामध्ये दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता मशाला मोर्चा काढण्यात आला.कार्यक्रमामध्य सभेला संबोधित करताना मराठा समाजाच्या विरोधात जे ओबीसी नेते वादग्रस्त विधान करतात त्यांचा आणि शिंदे सरकारचा जाहीर निषेध सामाजिक कार्यकर्ते धनंजय खाडे यांनी केला.

कसबा तारळे येथे एक दिवसाचे उपोषण
कसबा तारळे गावातून मनोज जरंगे पाटील यांना पाठींबा व मराठा आरक्षण मिळावे यासाठी गाव बंद करून पाठींबा देण्यात आला. विशेष म्हणजे या पाठिब्यासाठी मुस्लिम, मागासवर्गीय ,ओबीसी तसेच सर्व समाजातील युवक उपस्थित होते .त्यामध्ये सरपंच विमल पाटील, भोगावती कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील, भाजपचे माजी जिल्हाउपाध्यक्ष विलास जाधव, माजी उप सरपंच संदीप पाटील, पोलीस पाटील विक्रम सनगर, आनंदा जाधव, उदय पाटील, युवा नेते रोहित पाटील, जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती सातापा कांबळे, विश्वास पाटील, संजय धोंडी पाटील, हसन नाईक, प्रकाश पाटील, शेखर पाटील, निवास बावडेकर, दिलीप गोरे तसेच युवक मोठ्य संख्येने सहभागी झाले होते. सकाळी छ. शिवाजी महाराज याचा पुतळ्या जवळ घोषणा देऊन उपोषणाची सुरुवात करण्यात आली.

पुलाची शिरोलीमध्ये मंगळवारपासून साखळी उपोषणास
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पुलाची शिरोलीमध्ये मंगळवारपासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज चौकात हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.यावेळी बोलताना भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील ,माजी उपसरपंच कृष्णात करपे, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उत्तम पाटील, शिरोली विकास सोसायटीचे धनाजी पाटील, डॉ. सुभाष पाटील, यांचेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात महायुती सरकारने तात्काळ अधिवेशन बोलवावे व आरक्षण जाहीर करावे अशी मागणी केली. तसेच महाराष्ट्रात सुरू झालेला उद्रेक हा शासनाला परवडणारा नसेल. त्यामुळे या महायुती सरकारने आणखीन वाट न पाहता तात्काळ आरक्षण जाहीर करावे असे यावेळी आवाहन करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी तर्फे बुधवारी कोडोली बंद
मनोज जरांगे – पाटील यांच्या उपोषणाला तसेच मराठा आरक्षणासाठी पांठिबा देण्यासाठी कोडोली ता. पन्हाळा येथील महाविकास आघाडीतर्फे बुधवार दि. १ रोजी कोडोली बंदची हाक दिली आहे.शासनाने मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून आरक्षणाच्या निर्णयासाठी ४० दिवसांचा कालावधी घेतला होता. निर्णय प्रक्रियेतील दिरंगाईमुळे या कालावधीत शासन आरक्षणाचा निर्णय घेण्यास असमर्थ ठरले. याची जाणीव शासनाला हा कालावधी मागून घेताना झाली नव्हती का ? अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली आणि पुनश्च: मनोज जरांगे- पाटील यांनी अन्न-पाणी त्यागाचं आंदोलन सुरु केले. याला पांठिबा देण्यासाठी कोडोलीत दोन दिवसापूर्वी कॅन्डल मार्च काढण्यात आला होता.









