सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार
वार्ताहर/हेरे
एकीकडे पंतप्रधान सडक योजनेतून रस्त्यांचे नूतनीकरणाचे काम सुरू असताना, चंदगड तालुक्मयातील पश्चिम भाग रस्त्यांच्या बाबतीत खड्डेमय झाला आहे. हेरे ते तिलारी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे प्रवासी वर्गाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. खड्डेमय रस्ता, गंजून तुटलेले सूचनाफलक व खचलेल्या साईटपट्टय़ामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
अजून किती दिवस ही परिस्थिती अशीच राहणार, असे प्रश्न प्रवाशांना पडत आहेत. या रस्त्याच्या नूतनीकरणाला दोन वर्षापूर्वीच मान्यता मिळाली आहे. याचे टेंडर ही ठेकेदाराला देण्यात आले आहे. कामाचा दिखावूपणा करण्यासाठी आठ दिवस कामही ठेकेदाराने सुरू केले होते. पण कोरोनाचे कारण पुढे करत काम थांबवले आणि सध्या सुरू असलेल्या पावसात रस्त्याची चाळण झाली. प्रवास करताना खड्डे चुकवत वाहन चालवताना येथील प्रवासी जेरीस आला आहे. कंबर दुःखीसह वाहनाची कामे करावी लागत आहेत. तिलारी-पारगड परिसर वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या मार्गाने कोल्हापूर, मुंबई, बेळगाव, गोवा या ठिकाणावरून वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी प्रवासी ये-जा करत असतात. त्याशिवाय कर्नाटक, गोवा या दोन राज्यांना जोडण्याचं काम या मार्गाने केले आहे. त्यामुळे नेहमी या मार्गावर वर्दळ असते. पण सध्या हा मार्ग खड्डेमय झाला असून रस्त्यांवर असलेले सूचनाफलक किलो मीटर दर्शवणारे फलक गंजून तुटून गेले आहेत. याबाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. साईट पट्टय़ांचा वानवा आहे.
रस्त्याच्या बाजूला आलेली झाडी तोडली गेली नाही. रस्त्यांवर चिखलगाळ आलेला आहे. ओडय़ाजवळ पाणी वाहून साईट पट्टय़ा तुटलेल्या आहेत. अशी परिस्थिती असल्याने रोज प्रवास करणाऱया प्रवासी या मार्गाने ये-जा करण्यास कंटाळला आहे. या मार्गाच्या नूतनीकरणासाठी आंदोलने केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागावर मोर्चा काढला होता. ठेकेदार बदलण्याची व रस्ता नूतनीकरण ताबडतोब करण्याची मागणी केली होती. पण यातील एकाही प्रश्नाला समाधानकारक उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाला देता आले नाही. या मार्गाने अनोळखी प्रवास करणाऱया प्रवाशांना अनेकदा रस्त्याचा, खड्डय़ाचा अंदाज न आल्याने अपघातांना चालना मिळत आहे. अपघात घडत आहेत तर किलो मीटरचे अंतर दर्शवणारे सूचनाफलक गंजून मोडून पडल्यामुळे अनेकदा जायचे असते एका गावाला आणि दुसऱयाच गावाला जाऊन पोहोचण्याची वेळ प्रवासी वर्गावर ती येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबी विचारात घेऊन रस्ता नूतनीकरण, सूचना फलक व असलेल्या साईटपट्टय़ांचा मार्ग मोकळा करावा व प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









