म्हासुर्ली / वार्ताहर
जून महिन्यात मृर्ग नक्षत्राच्या पावसाने सर्वत्र पाठ फिरवल्यानंतर सोमवार सकाळ पासून आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने जोरदार सुरुवात केली. या संततधार पावसाने धामणी नदी दुथडी भरुन वाहत आहे. पावसामुळे खोळंबलेल्या शेतीकामांना वेग येणार असून शेतकरी वर्ग सुखावला आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रातील पावसाने हुलकावणी दिल्याने शेतीच्या कामासह पिकांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या पेरण्या यावेळी पावसाअभावी आर्द्रा नक्षत्रात करण्यात आल्या.
मात्र सोमवार सकाळपासून धामणी खोऱ्यात पावसाने जोरदार सुरुवात केल्याने ओढे, नाले तुडुंब भरुन वाहू लागले असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परिणामी धामणी नदीला पूर येऊन पाणी पातळीत वाढ झाली आहे. असाच पावसाचा वेग वाढला तर नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. एकंदरीत पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरीही शेतीकामांना वेग आला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.