कुंभोज/प्रतिनिधी
कुंभोज तालुका हातकलंगले येथे बुधवारी रात्री अचानक झालेल्या वादळी पावसामुळे बाजारपेठेत असणाऱ्या मोबाईल टॉवरवर वीज कोसळून परिसरातील घरामध्ये असणारे १० टीव्ही संच जळाले असून एक लाखापेक्षा जास्त रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे.
कुंभोज परिसरात रात्री अचानक आलेल्या वादळी पाऊस वारा व विजांचा कडकडात यामध्ये मोबाईल टॉवरवरती वीज पडून झालेल्या नुकसानीमध्ये परिसरात असणाऱ्या घरामधील विद्युत उपकरणे जाळली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने संतोष माळी, विनायक माळी,अमोल कळंत्रे, विश्वनाथ बनणे, रमजान अत्तार, रमेश जडे, शितल कळंत्रे यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, इन्व्हर्टर जळाले असून त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच सदर विजेचा प्रचंड आवाज झाल्याने परिसरात असणाऱ्या जनावरांनाही काही प्रमाणात सौम्य झटक्याचा त्रास झाला असून काही जनावरे आजारी असल्याचेही सकाळपासून चित्र दिसत आहे.
बुधवारी रात्री पडलेल्या विजेमुळे कुंभोज परिसरातील काही घरातील फ्रिज जळाले असून रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने सदर नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी यांनी केली आहे.









