चार दुचाकी, एक घरफोडी उघड : करवीर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/कोल्हापूर
मोटारसायकल चोरी व घरफोडी करणाऱ्या दोघांना करवीर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून चार मोटारसायकल चोरीचे गुन्हे तसेच राधानगरी येथील एका मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. राहुल बबन कांबळे (वय 32), ओंकार युवराज कांबळे (वय 21 दोघेही रा. गोकुळ शिरगांव ता. करवीर) अशी त्यांची नावे असल्याची माहिती करवीर पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
करवीर पोलीसांचे एक पथक गुरुवारी कळंब,पाचगांव, आर. के.नगर, मोरेवाडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन संशयीत विना नंबरफ्लेट दुचाकीवरुन पोत्यामध्ये साहित्य भरुन कंदलगांवच्या दिशेने जाताना दिसले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे राहुल कांबळे, ओंकार कांबळे असल्याचे सांगितले. त्यांच्याजवळील स्क्रॅपची तपासणी केली असता त्यामध्ये करता लागणारे साहित्य दिसून आले. तसेच त्यांच्याजवळील पोत्यामध्ये एक समई, देवपुजेचे भांडे, नंदादिप असेसाहित्य दिसून आले. त्यांनी 2 दिवसांपूर्वी आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथून चोरी केल्याची कबूली दिली. तर इस्पुर्ली, हुपरी, राजारामपुरी, करवीर येथून चार दुचाकी चोरल्याची कबूली दिली.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, पोलीस हेड काŸन्स्टेबल सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, विजय तळसकर, बालाजी हांगे, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, श्रीधर जाधव, रणजित देसाई, मुरलीधर लांघी यांनी ही कारवाई केली.