प्रतिनिधी,कोल्हापूर
बंद घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. पाचगाव (ता. करवीर) येथील स्वामी समर्थ कॉलनीत घडलेला हा प्रकार सोमवारी (दि. 8) दुपारी उघडकीस आला. याबाबत अक्षय वसंत आकोळकर (वय 32) यांनी मंगळवारी (दि. 9) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय अकोळकर हे राजेंद्रनगर येथील एका फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये नोकरी करतात. रविवारी (दि. 7) सकाळी पत्नी आणि मुलीसह पर्यटन आणि देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेले होते. सोमवारी सकाळी त्यांना शेजाऱ्यांनी फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. दुपारी परत आलेल्या आकोळकर कुटुंबीयांना चोरीचा प्रकार लक्षात आला.
चोरट्याने बेडरुममधील लाकडी कपाट उचकटून त्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याची चेन, एक तोळ्याचे कानातील टॉप्स, अर्धा तोळ्याची लहान चेन, लहान अंगठी, कानातील मुद्या असे 7 तोळे दागिने व चांदीचे पैंजण आणि इतर दागिने असा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली.
Previous Article‘फॉर्मेलिन’युक्त मासळीवर कडक नजर ठेवणार
Next Article ‘मोचा’ वादळ बांग्लादेश-म्यानमार किनारपट्टीकडे जाणार









