वारणानगर,प्रतिनिधी
Kododlo Crime News : बोरपाडळे राज्य मार्गावर शहापूर ता. पन्हाळा गावाजवळ असणाऱ्या कृषीरत्न ॲग्रोएजन्सी या दुकानात अज्ञात चोरट्यानी दुकानाच्या पूर्व बाजूचा पत्रा उचकटून रोख रकमेसह तीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला. दुकान सुरु झाल्यापासून या दुकानात आजची ही पाचवी चोरी आहे, चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. मालक प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरून घटनेची नोंद कोडोली पोलीसांत झाली असून अधिक तपास कोडोली पोलीस करत आहेत
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर येथे प्रशांत पाटील यांनी कृषीरत्न अॅग्रो एजन्सी नावाने दुकान चालू केले आहे दुकानामध्ये लाखो रुपायांचा मुद्देमाल असलेने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीवी कॅमेरे बसवले आहेत. या दुकानात दुकान सुरु झाल्या पासून दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा उचकटून अज्ञात चोरांनी आजपर्यत पाच वेळा चोरी केली आहे. बुधवार (दि. ९) रोजी मध्यरात्री दुकानाच्या पूर्व बाजूला दुकानाचा पत्रा उचकटून अज्ञात चोरांनी दुकानात प्रवेश केला.
दुकानाच्या गोडाऊन मधील शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचे बॉक्स, लॅपटॉप, टेबलचे ड्रॉवर उचकटून रोख रक्कम असा सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी लंपास केला आहे. अज्ञात दोन चोर दुकानात प्रवेश करताना आणि चोरी करताना चोरांचे फुटेज सीसीटीवीच्या कॅमेरात कैद झाले आहेत.चोर दुकानात प्रवेश करताना रेनकोट घातलेले होते तसेच डोक्यावर बॉक्स आणि कागदी पिशवी घातलेले सीसीटीव्हीच्या कॅमेरात दिसत आहे.
कृषीरत्न ॲग्रो दुकाना समोरच ७१५ कार वॉश नावाचे दुकान असून, येथेही अज्ञात चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी त्यांना काही सापडले नाही, या घटनेची माहीती मिळताच कोडोली पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा पंचनामा केला. या घटनेमुळे शहापूर गावासह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.









