पुलाची शिरोली/ वार्ताहर
भारतीय जनता पक्षाचे आमदार राहूल कुल यांना शिंदे- फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी नव्वद कोटी रुपये उकळण्याच्या कटातील म्होरक्या रियाज अल्लाबक्ष शेख वय ४१, या पुलाची शिरोलीतील बाॅक्साईड व्यावसायिकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे शिरोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेख याच्यासह योगेश मधुकर कुलकर्णी वय वर्षे ५७,, सागर विकास संगवई वय वर्षे ३७ व जाफर अहमद रसिद अहमद उस्मानी वय वर्षे ५३ रा. नागपाडा मुंबई यांंचा समावेश आहे.
रियाज शेख हा मराठी मुलांच्या शाळेसमोर मोठा बंगला बांधून रहात आहे. त्याचे शिक्षण नववी पर्यंत झाले आहे.घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे रियाज १९९६ नंतर शिरोली येथील एका व्हिडिओ सेंटरमध्ये कामाला लागला. यानंतर गावातच केबल ऑपरेटिंगची कामे करु लागला. पण रियाजला कमी वेळेत श्रीमंत व्हायचे होते. यातच तो कोल्हापुरातील एका बाॅक्साईड व मायनिंग उद्योजकाकडे कामाला लागला. तेथून काही दिवसांपूर्वी त्याने स्वतःची मायनिंग सुरू केली. शाहूवाडी, राधानगरी व गोवा येथे मायनिंगमध्ये पैसे मिळवले. अलिशान गाड्या घेतल्या, रुबाबात राहू लागला, विदेशी दौरे वाढले, जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांबरोबरही संबंध वाढवले . सध्या त्याचे शाहूपुरी येथे आॅफिस आहे. तेथे पाच कर्मचारी काम करतात.
या कामाच्या माध्यमातून शेख हा गोवा, मुंबई, पुणे, दिल्ली येथे शासकीय कार्यालयात विवीध परवाने घेण्याच्या माध्यमातून मंञी अधिकारी यांच्याशी जवळीक निर्माण झाली होती. याच माध्यमातून शेख याने एका केंद्रीय मंञ्याबरोबर फोटो काढले होते. हे फोटो त्याने आपल्या मिञांना मोबाईलमधील वेगवेगळ्या माध्यमातून व्हायरल केले आहेत.
यातूनच त्याने आपल्या अन्य मिञांना बरोबर घेऊन आमदार राहूल कुल यांना शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आपण दिल्ली येथे मंञी महोदयांना भेटून मुंबईत आलो आहे. तुम्ही मला भेटायला ओबेरॉय हॉटेल मध्ये या.असे शेखने भ्रमणध्वनीवरुन कुल यांना सांगितले. त्यांनी चर्चा केल्यानंतर फसवणूकीचे रॅकेट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी स्विय सहाय्यक ओंकार थोरात यांस सांगून खंडणी विरोधी पथकाकडे फिर्याद दाखल करण्यास सांगितले.
दरम्यान, मंञी करण्यासाठीची रक्कम नव्वद कोटी रुपये इतकी ठरली होती. त्यापैकी अठरा कोटी रुपयांची मागणी केली . व ती रक्कम मुंबई येथील ओबेरॉय हॉटेल मध्ये घेऊन येण्यास कुल यांना सांगण्यात आले होते. तत्पूर्वी खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून रियाज शेख सह चौघांना अटक केली.









