चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांची संख्या सातत्याने कमी, स्ट्रेचरवरून रूग्णांची होणारी हेळसांड थांबणार, तीन ई-ऍम्ब्युलन्ससाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू, एका ई कारसाठी पाच लाखांपर्यत खर्च अपेक्षित, दानशूर व्यक्ती, संस्थांना ‘सीपीआर’चे आवाहन
कोल्हापूर कृष्णात पुरेकर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयची संख्या कमी, असलेले वॉर्डबॉय शोधताना नातेवाईकांना होणारी कसरत, स्ट्रेचरची स्थिती अन् त्यातून रूग्ण नेताना वाढलेला धोका.. हे सारं टाळण्यासाठी ई ऍम्ब्युलन्सचा पर्याय समोर आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ई-ऍम्ब्युलन्ससाठी दानशूर, व्यक्ती, संस्थांना आवाहन केले आहे. सद्यस्थितीत हॉस्पिटलला 3 ई-ऍम्ब्युलन्सची गरज आहे. एका ई-ऍम्ब्युलन्ससाठी सुमारे 5 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. स्थानिक स्तरावर ती बनवल्यास तीन लाखांपर्यत खर्च अपेक्षित आहे.
सीपीआर हॉस्पिटल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत आहे. येथे 25 हून अधिक वॉर्ड आहेत. रोज सरासरी 1000 ते 1200 पर्यत बाहय़ रूग्णांची तपासणी होते. 650 बेडच्या हॉस्पिटलमध्ये सहाशेहून अधिक रूग्ण आंतररूग्ण विभागात उपचार घेत आहेत. येथे उपचारासाठी कोकणासह, शेजारील कर्नाटकातूनही रूग्ण येतात. त्यांना येथे चांगली सेवा मिळते. पण चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांची संख्या कमी, त्यातून तीन-चार वॉर्डसाठी एक वॉर्डबॉय अशी सध्याची स्थिती आहे. दुसरीकडे डय़ुटीवर असलेल्या वॉर्डबॉयला शोधण्यासाठी नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे. कित्येकदा स्ट्रेचरवर रूग्णाला ठेवून नातेवाईकांनीच त्याला वॉर्डमध्ये दाखल करण्याच्या घटना घडल्या आहेत.
‘सीपीआर’मध्ये वॉर्डबॉय आणि रूग्णांच्या नातेवाईकांतील वाद कमी करण्यासाठी ई ऍम्ब्युलन्सचा प्रस्ताव विचाराधीन आहे. सद्यस्थितीत अशा 3 ई-ऍम्ब्युलन्सची गरज आहे. मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये सध्या 3 ई-ऍम्ब्युलन्स कार्यरत आहेत. त्यांनी त्या डोनेशनमधून घेतल्या आहेत. स्थानिक कंपनीने मॉडीफाय केलेल्या ई-ऍम्ब्युलन्ससाठी सुमारे 3 लाखांचा खर्च आला आहे. तर कंपनीकडून मिळालेल्या ई-ऍम्ब्युलन्सचा खर्च 6 लाखांच्या घरात आहे. येथील ई ऍम्ब्युलन्सचा वापर पाहूनच सीपीआर प्रशासनाने ई ऍम्ब्युलन्ससाठी दानशुरांना आवाहन केले आहे.
येथील अपघात विभागातून आंतररूग्ण विभागात रूग्ण नेण्यासाठी स्ट्रेचर आहेत, पण त्यातील काही खराब झाल्या आहेत. चाके खराब झाल्याने या स्ट्रेचरवरून रूग्णाला वॉर्डपर्यत नेताना वॉर्डबॉयसह नातेवाईकांना तणावाचा अनुभव येत आहे. कित्येकदा वॉर्डबॉय नसेल तर नातेवाईकांना या खडखडत्या स्ट्रेचरवरून रूग्णाला नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हे सारे टाळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने डोनेशनमधून ई ऍम्ब्युलन्ससाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हय़ातील दानशूर व्यक्ती, संस्थांना ई ऍम्ब्युलन्ससाठी आवाहन केले आहे.
बॅटरीवर चालणाऱया या ई-ऍम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडर, स्ट्रेचर, सलाईन लावण्याची सुविधा आहे. रूग्णासह चालक, डॉक्टर आणि दोन नातेवाईक यात बसू शकतात. ई-ऍम्ब्युलन्स रॅम्पवरून थेट वॉर्डमध्ये नेणे शक्य आहे. ई-ऍम्ब्युलन्समुळे रूग्णाला स्ट्रेचरवरून वॉर्डमध्ये आणण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. दीक्षित यांनी दिली.