एकीकडे हद्दवाढीला विरोध दुसरीकडे ग्रामपंचायतीकडून चढ्या दराने मुलभूत सुविधा घेण्याची वेळ : हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांत दरवाढीविरोधात आंदोलनाचे वातावरण; मग हद्दवाढीला विरोध करून पदरात काय पडले
विनोद सावंत कोल्हापूर
घरफाळा, पाणीपट्टी वाढणार, या प्रमुख कारणांमुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध झाला. परंतु शहराच्या तुलनेत गावामध्येच आता पाणीपट्टी, घरफाळा आकारणी जास्त होत आहे. वडणगे गावातील हे चित्र आहे. हद्दवाढीला विरोध केला खरा पण ग्रामपंचायतीनेच खिशाला कात्री लावण्याचे काम सुरू केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, वडणगेत पाणीपट्टी वाढीविरोधात आंदोलनाचे वातावरण तयार झाले आहे.
कोल्हापूर नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन 50 वर्ष झाली, मात्र, शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. शहरात आल्यानंतर शेतजमिनीवर आरक्षण पडणार, पाणीपट्टी, घरफाळा वाढणार, अशी भीती प्रस्तावित गावांतील ग्रामस्थांना असल्यानेच त्यांच्याकडून हद्दवाढीत येण्यास विरोध झाला. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची चर्चा सुरू झाली. त्यावेळी प्रस्तावित गावांतून विरोध होतो. पाणीपट्टी, घरफाळा वाढ या मुद्यावर विरोध झाला. तेच मुद्दे आता कळीचे बनले आहेत. काही गांवामध्ये भरमसाठ पाणीपट्टी वाढवली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर महापालिकेच्या तुलनेत काही गावांनी 20 टक्के जादा पाणीपट्टी केली आहे. घरफाळा वाढीची हीच स्थिती आहे. एकीकडे हद्दवाढीला विरोध करायचा आणि शहराच्या तुलनेत चढ्या दराने ग्रामपंचायतीकडून मुलभूत सुविधा घ्यायची वेळ प्रस्तावित हद्दवाढीतील काही गावांतील ग्रामस्थांवर आली.
शहरालगतच असणाऱ्या वडणगेमध्ये सध्या पाणीपट्टी वाढीवरून वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीने वर्षाला असणारी 1200 रूपयांची पाणीपट्टी आता 2 हजार रूपये केली आहे. गावात 24 ऑगस्टच्या ग्रामसभेत हा निर्णय झाला आहे. वर्षाला 800 रूपयांची वाढ केली आहे. तसेच घरफाळाही शहराच्या तुलनेत येथे जादाच आहे. शहरात दर हजारी क्षेत्र असणाऱ्या मिळकतीला 1.40 पैसे प्रमाणे घरफाळा आकारणी होते. तर वडणगेमध्ये 1.80 पैसे प्रमाणे आकारणी होते. यामध्ये आरोग्य, दिवाबत्तीचीही आकारणी होते. शहराच्या तुलनेत येथे दर हजारी 45 पैसे जादा घरफाळा आहे. मग हद्दवाढीला विरोध करून पदरात काय पडले, असा सवाल उपस्थित होत आहे.
पाणी कपात 25 टक्के. ..पाणीपट्टी वाढ 70 टक्के
वडणगेमध्ये पूर्वी वर्षाला 1200 रूपये पाणीपट्टी आणि रोज 40 मिनटे म्हणजे महिन्याला 1 हजार मिनिंटे पाणीपुरवठा होत होता. आता 2 हजार पाणीपट्टी आणि दिवसाआड 50 मिनिटे पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पाणी कपात 25 टक्के आणि पाणीपट्टी वाढ 70 टक्के केली आहे. शहरात दोन वर्ष पाणीपट्टी वाढ नाही. शिवाय शुद्ध केलेले पाणी तीन ते चार तास मिळते.
अभ्यास करा, शहरात या…!
शहरापेक्षा हद्दवाढीतील प्रस्तावित गावांमध्ये घरफाळा, पाणीपट्टी जास्तच आहे. तसेच ग्रामपंचायत स्मशानभूमीची सेवाही पैसे घेऊन देते. महापालिका ही मोफत सेवा देते. आरोग्य, केएमटी सेवाही नाममात्र दराने दिल्या जातात. हद्दवाढीनंतर पहिली पाच वर्ष कर असणार नाही. या सर्वाचा अभ्यास करून 20 गावांनी शहरात यावे.
आर. के. पोवार. निमंत्रक, शहर हद्दवाढ कृती समिती
पाणीपट्टी वाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी
वडणगेत वाढीव पाणीपट्टीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या ग्रामसभेत यावर फेरविचार करण्याचे लेखी आश्वासन ग्रामपंचयातीने दिले असून नागरीकांनी वाढीव दराने पाणीपट्टी भरू नये, असे आवाहन केले आहे.
सचिन चौगुले, माजी लोकानियुक्त सरपंच, वडणगे
कचरा, आरोग्य सेवेपासून वंचित
शहरामध्ये कचऱ्यावर प्रक्रियेसाठी कचरा प्रकल्प आहे. ग्रामीण भागात कचरा प्रकल्प नसल्याने रस्त्यावरच कचरा पडलेला असतो. मनपाकडे अल्प दरात आरोग्य सेवा मिळते. ानपाचे पंचगंगा हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये शहरालगतचे रूग्ण सर्वाधिक असतात.