महिना अखेरीस केवळ 50 बस राहणार मार्गस्थ : प्रवाशीची होणार गैरसोय : 100 इलेक्ट्रीक बसची प्रतिक्षा
विनोद सावंत कोल्हापूर
केंद्र शासनाने 15 वर्षावरील वाहने स्क्रॅप करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे महापालिकेच्या केएमटी सेवेचे भवितव्य धोक्यात आले आहे. या धोरणानुसार 1 एप्रिल 2023 रोजी 42 बस स्क्रॅप झाल्या. याच नियमानुसार 31 डिसेंबर 2023 रोजी आणखीन 15 बस स्क्रॅप होणार आहेत. नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेत केवळ 50 बसच राहतील, अशी स्थिती आहे.
अगोदरच आर्थिक संकटात असणाऱ्या केएमटीचे चाक कोरोना, बस स्क्रॅप धोरणाने आणखीन खोलात गेले आहे. एकाचवेळी 42 बस स्क्रॅप झाल्याने केएमटी प्रशासनाला 10 हून अधिक मार्गावरील बस बंद केल्या. फेऱ्या बंद झाल्यामुळे मार्गस्थ बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. बसण्यासाठी सोडाच उभारण्यासाठीही जागा मिळत नाही. दरम्यान, आमदार फंडातून 9 एसी बस मिळाल्या. यामुळे केएमटीवरील ताण काही अंशी कमी झाला. केएमटीची सेवा रूळावर येईल, असे चिन्ह असतानाच डिसेंबर अखेर आणखीन 15 बस स्क्रॅप होत आहेत. 1 जानेवारी 2024 पासून 15 बस वर्कशॉपमध्येच लावून ठेवाव्या लागणार आहेत. यामुळे 50 बसच मार्गस्थ होणार आहेत.
9 बस आल्या 8 बस बंद झाल्या
स्क्रॅप होणाऱ्या 15 बस पैकी 7 बस नादुरूस्त असल्याने वापरत नाहीत. मात्र, 8 बस वापरात होत्या. एकीकडे एसी 9 बस आल्या आणि दुसरीकडे 8 बस स्क्रॅप झाल्या आहेत. विशेष म्हणजे स्क्रॅप झालेल्या बसची आसन क्षमता नवीन बसच्या तुलनेत जादा आहे. सध्याच्या घडीला नवीन बस खरेदी करण्याची केएमटीची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे पुन्हा प्रवाशांचे हाल होणार आहे.
—————————-
केएमटीचे आता 100 ‘ई’ बसवरच भवितव्य
केंद्र शासनाकडून केएमटीला 100 ‘ई’ बस मिळणार आहेत. केंद्र शासनाकडून टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. 17 डिसेंबर टेंडर भरण्याची अंतिम दिवस आहे. नवीन वर्षात ई बस येणार आहेत. या बसवरच आता केएमटीचे भवितव्य आहे. परंतू या बसवरील चालक नियुक्ती ठेकेदार ऐवजी केएमटीचे होणे आवश्यक आहे. अन्यथा केएमटीचे खासगीकरण होण्यास वेळ लागणार नाही.
अनुदानही मिळेना, बस स्क्रॅपही होईना
15 वर्षापूर्वीची वाहने स्क्रॅप केल्याने नवीन वाहने खरेदीसाठी राज्य शासनाला केंद्र शासनाकडून 150 कोटींचे अनुदान मिळणार होते. राज्य शासन यापैकी काही अनुदान महापालिकेला देणार होते. आठ महिने झाले तरी अनुदान मिळालेले नाही. तसेच 15 वर्षावरील वाहने प्रादेशिक परिवहन विभाग स्क्रॅप करून मिळणारी रक्कम महापालिकेला देणार होती. मात्र, स्क्रॅपची प्रक्रियाही अद्याप झालेली नाही.
50 बस आणि 40 हजार प्रवासी
पुढील महिन्यानंतर केएमटीच्या केवळ 50 बस सुरू राहणार आहेत. सध्या केएमटीमधून रोज सुमारे 40 हजार प्रवासी प्रवास करतात. 15 बस स्क्रॅपमुळे पुन्हा बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. कमी प्रवाशी असणाऱ्या ठिकाणच्या बस फेऱ्या कमी करून जादा प्रवासी असणाऱ्या मार्गावर जादा बस सुरू केल्यास काही अंशी प्रवाशांची गैरसोय टळू शकते. यासाठी केएमटीने उपलब्ध बसचे नियोजन योग्य करणे आवश्यक आहे.
बजेटमध्ये बस खरेदीसाठी निधीची तरतूद करणे आवश्यक
महापालिकेचे दरवर्षी बजेट केले जाते. दरवर्षी बजेटमध्ये 5 बस खरेदीसाठी निधीची केल्यास पाच वर्षात 25 बस ताफ्यात येऊ शकतात. तसेच आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमाणे जिल्ह्यातील इतरही आमदारांनी बस खरेदीसाठी आमदार फंड दिला तर केएमटीसमोरील संकट काही अंशी कमी होऊ शकतो.
कोरोनापूर्वी सेवेत असणाऱ्या बस -101
स्क्रॅप झालेल्या बस -42
नव्याने दाखल झालेल्या एसी बस -9
सध्या मार्गस्थ बस -65
पुढील महिन्यांत स्क्रॅप होणाऱ्या बस-15









