कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिका प्रशासनाच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीतील बेड क्रमांक 1 ते 12 येथे नव्याने बेड उभारण्याचे काम सुरू झाले आहे. खराब झालेले पत्रे काढण्यात आले आहेत. पिलर आणि पत्रे नव्यानेच घालण्यात येणार आहे. या कामासाठी चार महिन्यांचा अवधी लागणार असल्याने 12 बेड बंद ठेवले आहेत.
पंचगंगा स्मशानभूमी येथील बेड क्रमांक 1 ते 12 च्या शेडचे पत्रे गेल्या वर्षभरापासून खराब झाले आहेत. मागील पावसाळ्यात बेडवर पाणी येत असल्याने बेडचा वापर करता आला नाही. या कामासाठी 54 लाखांच्या निधीची तरतूद करून संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर देवूनही बेड आणि पत्रे दुरूस्तीचे काम सुरू झाले नव्हते. अखेर ठेकेदाराने शनिवारपासून काम सुरू केले आहे.
संकटावेळीच गॅसदाहिनीत बिघाड
गॅस दाहिनीतील बर्नर खराब झाल्याने दाहिनी धुळखात पडली आहे. सध्या पंचगंगा स्मशानभूमीत 32 बेडच वापरात येतात. अशा स्थिती गॅसदाहिनी सुरू असती तर स्मशानभूमीतील ताण कमी झाला असता. परंतू गॅस दाहिनीचा वापर होत नसल्याने मनपा प्रशासनानेही त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले.
पंचगंगा स्मशानभूमीतच अंत्यसंस्कारासाठी हट्ट
बेडच्या कामांमुळे 32 बेड बंद केले आहेत. मनपा प्रशासनाने कसबा बावडा, कदमवाडी, बापट कॅम्प येथे अंत्यसंस्कार करण्याचे आवहन जरी केले असले तरी पंचगंगा स्मशानभूमीतच अंत्यसंस्कारासाठी हट्ट धरला जाता आहे.
बर्नर खराबमुळे गॅसदाहिनी बंद
गॅसदाहिनीमध्ये दोन बर्नर असून एक बर्नर खराब झाला आहे. यामुळे गॅसदाहिनी बंद असून दुरूस्तीसाठी इस्टीमेट केले आहे. संबंधितांकडून बर्नर दुरूस्त करून गॅसदाहिनी सुरू केली जाणार आहे.
सौरभ घावरी, आरोग्य निरिक्षक, महापालिका
चार महिने होणार त्रास
कोल्हापूरमध्ये मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, संकष्टी आणि एकादशी दिवशी रक्षाविसर्जन केले जात नाही. रक्षाविसर्जन झाले नसल्याने काही वेळेस बेड उपलब्ध होत नाहीत. पंचगंगा स्मशानभूमीतील आता तर 12 बेड बंद असून केवळ 32 बेड शिल्लक आहेत. 12 बेड नव्याने करण्यास चार महिने लागणार आहेत. दरम्यान, मनपाच्या इतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.
कोरोनात होते तर मग आता का नाही?
पहिल्या लाटेत कोरोना मृतांवर स्मशानभूमीतील कर्मचारीच अंत्यसंस्कार करत होते. नातेवाईक कोणीच येत नव्हते. रोज 100 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत होते. बेड 44 असल्याने सकाळी अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुपारी रक्षा बाजूला करून पुन्हा लाकूड शेणी लावून बेड केला जात होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत अंत्यसंस्कारा दिवशीच रक्षाविसर्जन केले जात होते. कोरोनात होते तर मग आता का नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. किमान बेड नवीन होईपर्यंत दुसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन करणे योग्य ठरणार आहे.









