राज्यात आणि देशात गेल्या 60 वर्षात नव्हती इतकी अस्थिर परिस्थिती कधीच नव्हती. त्यामुळे सध्या देश एकाधिकारशाहीकडे चालला आहे. अशी टिका करून लोकांच्या आग्रहास्तव मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून शाहू फुले आंबेडकरांचा माझ्यावर असलेला प्रभाव मी पुढे घेऊन जाणार असल्याचं मत महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं आहे.
पहा VIDEO>>>जनतेच्या आग्रहामुळेच लोकसभेच्या मैदानात; श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कोल्हापूरात येऊन शाहू महाराज छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच शाहू महाराजांच्या उमेदवारीला पाठींबा असल्याचं सांगितलं. त्यांनंतर काही तासानंतर काँग्रेसकडून महाराजांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली.
आज सकाळी शाहू महाराज यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी बोलताना ते म्हणाले, “सर्व मित्र पक्ष विशेषतः महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं मी आभार मानतो. जनतेच्या आग्रहस्तव मी तुमच्यासमोर त्यामुळे जनतेचेही आभार. शककर्ते शिवाजी महाराज यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला. आधुनिक काळात छत्रपती शाहू महाराज यांचं समतेसाठी कार्य केलं. त्यामुळे फुले- शाहू- आंबेडकर यांचा विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे आणि तोच विचार मी पुढे घेऊन जाणार आहे.” अशी आपली भुमिका स्पष्ट केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “माझा भर विकासाच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न सोडवण्यावर असणार आहे. मी राजकारणात प्रत्यक्षात कधीच नसलो तरी राजकारणाच्या सीमेवर नेहमीच होतो. आता बदलत्या राजकिय परिस्थितीमध्ये जनतेच्या आग्रहस्तव मी निवडणुकिच्या मैदानात आहे. पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असून उद्धव ठाकरे यांनी मनापासून पाठिंबा दिला आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
75 वर्षात काँग्रेसने पाया रचला…
काँग्रेसने अनेक कामे केली असून गेल्या 75 वर्षात देशाचा पाया रचला. आपल्या लोकांना सरक्षण देणं, समतेचा विचार राखणं,आणि विकास साधणे हेच आपलं हिंदुत्ववाद आहे…असंही शाहू छत्रपती म्हणाले.
समाजाला दिशा मिळाली पाहीजे…
मोदी हे 10 वर्षापासून पंतप्रधान आहेत…त्यांच काम कमी लेखून चालणार नाही. पण समाजाला दिशा पाहिजे. ती दिशा सुधारणे अपेक्षित होते. पण ती सुधारेल असं दिसतही नाही.
गेल्या 60 वर्षात नव्हती इतकी अस्थिर परिस्थिती.
आज महाराष्ट्रात परिस्थितीचा विचार केला तर गेल्या 60 वर्षात जितकी नव्हती तितकी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचं कारण पक्षांतर बंदी कायदा अयशस्वी झाला आहे. एक तर हा कायदा काढून टाकला पाहीजे किंवा या कायद्याला जास्त मजबूत करायला हवा…असे शाहू छत्रपती महाराज म्हणाले.